वृत्तसंस्था, चेन्नई – ग्लेन फिलिप्स (३६ चेंडूंत नाबाद ७६) आणि रचिन रवींद्र (३९ चेंडूंत नाबाद ५९) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने मंगळवारी कॅनडाचा आठ गडी राखून सहज पराभव करत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल आठ’ फेरीत प्रवेश केला. कॅनडाच्या युवराज सामराचे (६५ चेंडूंत ११०) विक्रमी शतक व्यर्थ ठरले.
‘ड’ गटातून आपले आव्हान कायम राखण्यासाठी कॅनडा आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना विजय आवश्यक होता. चेन्नई येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर युवराजच्या शतकाच्या जोरावर कॅनडाने २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. मात्र, फिलिप्स आणि रवींद्रच्या १४६ धावांच्या अभेद्य भागीदारीने युवराजची विक्रमी खेळी झाकोळली गेली. न्यूझीलंडने १५.१ षटकांतच २ बाद १७६ धावा करून विजय मिळवला. फिलिप्सने सहा षटकार आणि चार चौकार, तर रचिनने तीन षटकार आणि चार चौकारांची आतषबाजी केली.
आक्रमक खेळाच्या नादात फिन ॲलन (२१) आणि टीम सेफर्ट (६) लवकर बाद झाल्याने न्यूझीलंड संघ २ बाद ३० असा अडचणीत आला होता. त्या वेळी फिलिप्स आणि रवींद्र यांनी ‘पॉवर-प्ले’मध्येच न्यूझीलंडची धावसंख्या ६० पर्यंत नेली. त्यानंतरच फिलिप्सच्या आक्रमकतेला अधिकच धार आली. त्याने २२ चेंडूंतच आपले अर्धशतक साजरे केले. ट्वेन्टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडकडून हे सर्वांत जलद अर्धशतक ठरले. रवींद्रने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल्यावर षटकारांची मालिका लावत न्यूझीलंडच्या विजयावर झटपट शिक्कामोर्तब केले. या गटात दक्षिण आफ्रिका आघाडीवर राहिला असून, न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. कॅनडाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांची अखेरची लढत अफगाणिस्तानशी होणार आहे.
तत्पूर्वी, डावखुरा युवा फलंदाज युवराज समराने ५८ चेंडूंत शतक झळकावून ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आपले नाव कोरले. समराने आपल्या ६५ चेंडूंतील शतकी खेळीत सहा षटकार आणि ११ चौकार मारले. त्याला कर्णधार दिलप्रीत बाजवाची साथ मिळाली. या जोडीने ११६ धावांची सलामी दिली. मात्र, बाजवाला (३९ चेंडूंत ३६) धावांचा वेग राखता आला नाही. तो बाद झाल्यावर समराने ९१ धावांवर मॅट हेन्रीकडून मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत पहिलेवहिले शतक साजरे केले. कॅनडाला अखेरच्या तीन षटकांत केवळ २३ धावा करता आल्यामुळे त्यांच्या आव्हानावर मर्यादा पडल्या.
संक्षिप्त धावफलक
कॅनडा : २० षटकांत ४ बाद १७३ (युवराज सामरा ११०, दिलप्रीत बाजवा ३६; जेकब डफी १/२५, मॅट हेन्री १/२८) पराभूत वि. न्यूझीलंड १५.१ षटकांत २ बाद १७६ (ग्लेन फिलिप्स नाबाद ७६, रचिन रवींद्र नाबाद ५९; साद बिन जफर १/२९).
ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सर्वांत युवा शतकवीर
युवराज सामरा (कॅनडा) : १९ वर्षे १४१ दिवस
अहमद शहझाद (पाकिस्तान) : २२ वर्षे १२७ दिवस
सुरेश रैना (भारत) : २३ वर्षे १५६ दिवस
ॲलेक्स हेल्स (इंग्लंड) : २५ वर्षे ८३ दिवस
ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड) : २५ वर्षे ३२७ दिवस

