कोणताही क्रिकेट मालिका सुरू होते तेव्हा संघाबरोबर कोचसह सपोर्ट स्टाफचा मोठा ताफा कार्यरत असतो. येत्या काही काळात मात्र संघ एकीकडे आणि कोच दुसरीकडे असं विचित्र दृश्य पाहायला मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ येत्या काही दिवसात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यानंतर ते बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच काळात पाकिस्तान सुपर लीग सुरू होत आहे. न्यूझीलंडच्या कोचिंग टीममध्ये अष्टपैलू जेकब ओरम आणि फलंदाजी प्रशिक्षक ल्यूक राँची यांचा समावेश आहे. हे दोघेही पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद युनायटेड संघाशी संलग्न आहेत. न्यूझीलंडच्या मालिका आणि पाकिस्तान सुपर लीग एकाचवेळी होत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांना पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या मंजुरीमुळे न्यूझीलंड संघ खेळत असताना त्यांचे कोच पाकिस्तानात असं चित्र पाहायला मिळेल.

ल्यूक राँची इस्लामाबाद युनायटेड संघासाठी तीन हंगाम खेळला. राँची आता इस्लामाबाद युनायटेड संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे तर जेकब ओरम सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. ‘ल्यूक आणि जेकब यांना पाकिस्तान सुपर लीगच्या निमित्ताने न्यूझीलंडबाहेर प्रशिक्षणाची संधी मिळते आहे. त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दीसाठी ते महत्त्वाचं असेल. त्याठिकाणी मिळणारा अनुभव न्यूझीलंड संघासाठी उपयुक्त ठरेल’, असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे. १५ ते २५ मार्च दरम्यान न्यूझीलंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. यानंतर ते बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र या दौऱ्याचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.

ल्यूक आणि जेकब यांच्या अनुपस्थितीत जॉनी बेसेट ग्रॅहम आणि ग्रीम अल्टरिज हे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांचे साहाय्यक म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत काम पाहतील. बांगलादेश दौऱ्यात ब्रेंडन डॉन्कर्स हे वॉल्टर यांचे साहाय्यक असतील. जॉनी, ग्रीम आणि ब्रेंडन यांच्यासाठी राष्ट्रीय संघाच्या कोचिंग टीमचा भाग होणं ही मोठी गोष्ट आहे. ही संधी त्यांना अतिशय उपयुक्त ठरले. हे तिघेही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अनेक वर्ष प्रशिक्षणाचं काम करत आहेत.