न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमवर करण्यात आलेल्या मॅच-फिक्सिंगच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगून न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने त्याची पाठराखण केली आहे.
मॅक्क्युलमवर २००८मध्ये मॅच-फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्यामुळे त्याची चौकशी करण्यात आली नाही. ब्रेंडन हा स्वच्छ प्रतिमेचा खेळाडू असून आयसीसीनेही त्याची चौकशी केलेली नाही, किंबहुना त्याची साक्षच अन्य आरोपींविरुद्ध पुरावा भक्कम करण्यासाठी उपयोगी ठरली आहे, असेही मंडळाने म्हटले आहे.
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक म्हणाला, ‘‘आयसीसीने याबाबत कडक कारवाई केल्यानंतर अशा घटना संपल्या असाव्यात, असा माझा अंदाज होता. मात्र पुन्हा अशा घटनांचे वृत्त येत असल्यामुळे मी खरोखरीच दु:खी झालो आहे.’’