भारतातलं क्रिकेटप्रेम हे जगविख्यात आहे. मात्र, बऱ्याचदा हे प्रेम पुरुष क्रिकेटवर जास्त दिसून येतं. त्या प्रमाणात महिला क्रिकेटचे चाहते कमी दिसून येतात. याच पार्श्वभूमीवर महिला आणि पुरूष क्रिकेटर्सला समान मानधनाचा मुद्दा अनेकदा चर्चेला येतो. मात्र, त्यावर अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. इतर देशांमध्ये देखील कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती असताना न्यूझीलंडनं मात्र त्यावर अखेर तोडगा काढला आहे. महिला आणि पुरुष क्रिकेटर्सला समान मानधन देण्याची घोषणा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतातील स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात न्यूझीलंडनं केल्याचं दिसून येत आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून ५ जुलै रोजी अंतिम स्वरूप देण्यात आलेल्या करारांनुसार आता न्यूझीलंडच्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा निर्णय बोर्डाशी संबंधित सर्व प्रकारच्या क्रिकेटपटूंना लागू होणार असल्यामुळे एकदिवसीय, टी-२०, फोर्ड ट्रॉफी आणि सुपर स्मॅश लीगमध्ये खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना देखील त्यांच्या श्रेणीतील पुरुष क्रिकेटपटूंएवढंच मानधन मिळणार आहे.

याशिवाय, महिला क्रिकेटपटूंसोबत करण्यात येणाऱ्या करारांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवोदित महिला क्रिकेटपटूंना अधिकाधिक सामने खेळण्याची संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. “आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना पुरुषांप्रमाणेच मानधन मिळणं ही फार मोठी बाब आहे. हे एक मोठं पाऊल असून त्याचा तरुण महिला क्रिकेटपटूंना फायदा होणार आहे”, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार सोफी डिव्हाईन हिनं दिली आहे.

न्यूझीलंड पुरुष संघाचा कर्णधार केन विल्यमसननं देखील यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. “महिला आणि पुरुष अशा दोन्ही क्रिकेटपटूंनी त्यांना असलेला वारसा वाढवणं आणि तो पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करणं फार महत्त्वाचं असतं. ते साध्य करण्यासाठी या नव्या करारामुळे मोठा हातभार लागणार आहे”, असं विल्यमसन म्हणाला आहे.