अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे प्रेरणास्रोत, ट्वेन्टी-२० क्रिकेटचे जनक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर आपल्या नेत्रदीपक फलंदाजीबरोबर चाणाक्ष नेतृत्वाने अढळ स्थान निर्माण करणारे न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांचे कर्करोगाने गुरुवारी निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्याच्या निधनाबाबत क्रिकेट जगतामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मैदानावर क्रो जसे धाडसी होते, तसे ते खासगी आयुष्यातही. त्यामुळे कर्करोगाला ‘मित्र’ असे संबोधण्याचे धाडस त्यांनी केले होते. क्रो यांना २०१२ साली पहिल्यांदा कर्करोगाचे निदान झाले होते. यामधून ते बरे होतील, असे वाटत असतानाच सप्टेंबर २०१४मध्ये त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याने निष्पन्न झाले. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांसमवेत ते ऑकलंड येथे राहत होते आणि तिथेच त्यांचे निधन झाले.
हॉलीवूडमधील अभिनेते रसेल क्रो हे मार्टिन यांचे चुलत बंधू होते. कर्करोगाशी झुंजत असताना रसेल हे मार्टिन यांच्या पाठिशी होते. मार्टिन यांच्या निधनानंतर रसेल म्हणाले की, ‘‘मार्टिन माझ्यासाठी चॅम्पियन, हिरो आणि मित्र होता. माझे त्याच्यावर कायम प्रेम राहील. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.’’
न्यूझीलंडसाठी मार्टिन क्रो हे एक आधारस्तंभ होते. जेव्हा ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या नावावर बरेच विक्रम होते. मार्टिन यांनी ७७ कसोटी सामन्यांमध्ये ४५.३६च्या सरासरीने ५४४४ धावा केल्या. न्यूझीलंकडून सर्वाधिक धावा, सर्वोत्तम धावसंख्या (२९९), सर्वाधिक शतके (१७) आणि सर्वाधिक अर्धशतके (३५) हे विक्रम त्यांच्या नावावर होते. न्यूझीलंडची फलंदाजी ही क्रो यांच्या नावाने ओळखली जायची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यावर क्रो यांनी खेळासंदर्भात लिखाण आणि समालोचन केले. ‘क्रिकेट मॅक्स’ हा नावीन्यपूर्ण खेळाचा प्रकार त्यांनी अमलात आणून दाखवला. भविष्याची पावले ओळखून ट्वेन्टी-२० क्रिकेटचा विचार त्यांनी मांडला. ४८व्या वर्षी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेत त्यांनी साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. न्यूझीलंडच्या संघातील रॉस टेलर आणि मार्टिन गप्तील या दोन्ही फलंदाजांना घडवण्यात क्रो यांचा महत्त्वाचा वाटा होता.
१९९२ साली झालेल्या विश्वचषकात त्यांनी न्यूझीलंडचे कर्णधारपद भूषवले होते आणि संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या विश्वचषकात क्रो यांनी गोलंदाजीमध्ये काही यशस्वी प्रयोगही केले. त्यांच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे क्रिकेट जगताने न्यूझीलंडची दखल घ्यायला सुरुवात केली होती.

क्रो यांची कारकीर्द अद्वितीय- आयसीसी
‘‘क्रो एक महान क्रिकेटपटू होते. आपल्या खेळाच्या जोरावर त्यांनी मानसन्मान कमावला. कलात्मक फलंदाजी आणि कणखर मानसिकता यासाठी त्यांच्यावर क्रिकेटजगताने अपार प्रेम केले. त्यांच्या फलंदाजीमध्ये शिस्तबद्धता होती. कोणत्या चेंडूवर कसा फटका मारावा, यामध्ये ते वाकबगार होते. त्यांची कारकीर्द ही अद्वितीय अशीच होती,’’ अशी श्रद्धांजली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी वाहिली. ते पुढे म्हणाले की, ‘‘क्रो हे नावीन्य आणि सर्जनशीलतेचा झरा होते. आजारपणातही खेळासाठी ते उत्साही होते. दुर्धर आजार होऊनही २०१५ विश्वचषकाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी दिलेले योगदान कुणीही विसरू शकत नाही.’’