कानपूर : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेसाठी गुरुवारपासून सुरू होणारा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना कौशल्याची दुहेरी कसोटी पाहणारा ठरणार आहे. भारताचे यशस्वी नेतृत्व करण्याबरोबरच फलंदाजीतही छाप पाडण्यास रहाणे उत्सुक आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. परंतु दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा विचार करता रोहित, ऋषभ पंत, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. के. एल. राहुल दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार असून कोहली दुसऱ्या कसोटीसाठी संघात दाखल होईल. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या अनुभवी आणि युवा खेळाडूंचा रहाणे कशाप्रकारे मेळ साधणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

फलंदाजीतही गेल्या काही काळापासून रहाणेला सातत्याने योगदान न देता आलेले नाही. गेल्या ११ सामन्यांत रहाणेने अवघ्या १९च्या सरासरीने धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध गेल्या तीन कसोटींमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला असल्याने रहाणेच्या शिलेदारांपुढे ही मालिका खंडित करण्याचेही आव्हान असेल.

श्रेयसच्या पदार्पणाकडे लक्ष

मुंबईकर श्रेयस अय्यर गुरुवारी कारकीर्दीतील पहिला कसोटी सामना खेळणार असल्याचे रहाणेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रोहित-राहुल यांच्या अनुपस्थितीत मयांक अगरवाल-शुभमन गिल ही युवा जोडी सलामीला येईल. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, रहाणे, श्रेयस आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा असा भारताचा फलंदाजी क्रम असू शकतो.

  रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने चार कसोटी सामने जिंकले आहेत, तर एक लढत अनिर्णित राहिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला नमवल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे भारताने रहाणेच्या नेतृत्वाखाली यश मिळवले आहे.

*वेळ : सकाळी ९.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदूी