वर्षभरापूर्वी भारतात येऊन भारतीय संघाला कसोटी मालिकेत चीतपट करण्याची किमया साधणारा न्यूझीलंडचा संघ वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतात येत आहे. भारतीय संघाचा वर्षाचा शेवट विजयाने व्हावा असं वाटावं इतका अनुनभवी संघ न्यूझीलंडने जाहीर केला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी रात्री उशिरा वनडे आणि टी२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली.
वनडे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघाचा भाग असणार आहेत. या दोघांसह भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडच्या अनुनभवी माऱ्याविरुद्ध मोठी खेळी करण्याची सुवर्णसंधी आहे. न्यूझीलंडने २०२४ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारताचा ३-० असा धुव्वा उडवला होता. या पराभवाची परतफेड करण्याची सर्वोत्तम संधी भारतीय संघासमोर आहे.
वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाचं नेतृत्व अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलकडे सोपवण्यात आलं आहे. प्रमुख खेळाडू संघात परतल्यानंतर ब्रेसवेलला अंतिम अकरात स्थान मिळण्याची शक्यता धूसर आहे.
नियमित कर्णधार मिचेल सँटनर दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज केन विल्यमसन या काळात दक्षिण आफ्रिकेतील टी२० लीगमध्ये खेळणार असल्याने त्याने या मालिकेसाठी अनुपलब्धता कळवली आहे.
वेगवान गोलंदाजांचं त्रिकुट विल्यम ओ रुक, नॅथन स्मिथ आणि ब्लेअर टिकनर दुखापतीमुळे संघाचा भाग नाहीत. दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने मॉट हेन्री वनडे मालिकेसाठीच्या संघाचा भाग नसेल. मुलाच्या जन्मावेळी पत्नीबरोबर राहायचं असल्यामुळे टॉम लॅथम वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे रचीन रवींद्र आणि जेकब डफी यांना वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
लॉकी फर्ग्युसन, अॅडम मिल्न, फिन अॅलन आणि टीम सैफर्ट हे जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या टी२० लीगमध्ये खेळत आहेत. ते भारताविरुद्धच्या टी२० मालिकेच्या उत्तरार्धात संघात सामील होतील.
डावखुरा फिरकीपटू जेडेन लेनॉक्स याला पहिल्यांदाच न्यूझीलंड संघात स्थान मिळालं आहे. जेडेनने न्यूझीलंड अ संघासाठी खेळताना चांगली कामगिरी केली आहे. फोर्ड ट्रॉफी स्पर्धेत सेंट्रल ड्रिस्ट्रिक्ट्स संघासाठी खेळतानाही त्याने छाप उमटवली. बॉलिंग ऑलराऊंडर क्रिस्तिअन क्लार्क, फिरकीपटू ऑलराऊंडर आदित्य अशोक, जोश क्लार्कसन आणि मायकेल रे यांनाही संघात समाविष्ट करण्यात आलं आहे.
न्यूझीलंडच्या या दौऱ्याची सुरुवात ११ जानेवारीपासून बडोदा इथे होणाऱ्या वनडे लढतीने होत आहे. न्यूझीलंड या दौऱ्यात ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे.
