क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर न्युझीलंडचा डावखुरा फलंदाज डेव्हन कॉनवे याने शतक झळकावले आहे. २५ वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केलेल्या रेकॉर्डला बुधवारी ब्रेक लागला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात डेव्हन कॉनवेने पदार्पण केले आणि इतिहास रचला. डेव्हन कॉनवेने पदार्पण कसोटीतच शतक ठोकले आणि एवढेच नव्हे तर तो या मैदानावरील पदार्पण कसोटीतील सर्वात मोठा डाव खेळणारा परदेशी फलंदाजही ठरला.

कॉनवेने सौरव गांगुलीचा १९९६ सालातील विक्रम मोडला. गांगुलीने २५ वर्षांपूर्वी लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पण करताना शतक झळकावले होते आणि १३१ धावांची खेळी केली होती. गांगुलीने ३०१ चेंडूंचा सामना करताना हे शतक झळकावले. चक्क २५ वर्षानंतर कॉनवेने हा विक्रम मोडला आहे. त्यामुळे सौरव गांगुलीची देखील क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा आहे.

लॉर्डवर कसोटीच्या पहिल्याच दिवशी डेव्हन कॉनवे नाबाद परतला. पहिल्या दिवशी न्यूझीलंडने ३ गडी राखून २४६ धावा केल्या. कॉनवे १३६ आणि हेन्री निकोल ४६ धावांवर नाबाद आहेत. पदार्पण कसोटी सामण्यात शतक झळकवणारा डेव्हन कॉनवे न्यूझीलंडचा १२ वा खेळाडू आहे. तसेच तो लॉर्ड्समध्ये पहिल्याच दिवशी शतक झळकावणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा – आज असा क्रिकेटपटू कसोटी पदार्पण करतोय, ज्याने घर-गाडीसकट सर्वकाही विकलंच, पण देशही सोडला!

कॉनवे आणि सौरव गांगुलीमध्ये एक समानता आहे. कॉनवे आणि सौरव गांगुली या दोघांचे वाढदिवस ८ जुलै एकाच दिवशी आहेत. तसेच ते दोघे डावखुरे फलंदाज आहेत.

कॉनवे मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असून २००९ मध्ये त्याने प्रथम श्रेणीमध्ये प्रवेश केला. काही वर्ष दक्षिण आफ्रिकेत खेळल्यानंतर तो २०१७ मध्ये न्यूझीलंडला गेला. न्यूझीलंडमध्ये करिअर करण्यासाठी २९ वर्षीय कॉनवेने सप्टेंबर २०१७ मध्ये जोहान्सबर्ग सोडले. कॉनवे दक्षिण आफ्रिकेत द्वितीय स्तराचे स्थानिक क्रिकेट खेळला, पण तिथे त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याने न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कॉनवे वेलिंग्टन गेला आणि चित्रच पालटले. वेलिंग्टनकडून कॉनवेने १७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १५९८ धावा केल्या. कॉनवेची सरासरी ७२पेक्षा जास्त राहिली.