गेल्या रविवारी अहमदाबाद इथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. आठवडाभरात न्यूझीलंडचा संघ टी२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. फायनल खेळलेल्या अकरा मंडळींपैकी ७ जणांना न्यूझीलंडने बाजूला सारलं आहे.
संघाचं नेतृत्व मिचेल सँटनरकडे आहे. वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना खेळायची संधी न मिळालेल्या डेव्हॉन कॉनवेला न्यूझीलंडने संधी दिली आहे. या दोघांच्या बरोबरीने कोली मॅकहोनी, जेमी नीशाम आणि कायले जेमिसन या सामन्यात खेळत आहेत. मात्र टीम सैफर्ट, फिन अॅलन, रचीन रवींद्र, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलीप्स, जेकब डफी, मॉट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, इश सोधी या सगळ्यांना न्यूझीलंडने विश्रांती दिली आहे. मायकेल ब्रेसवेल, अॅडम मिल्न, ब्लेअर टिकनर आणि विल्यम ओ रुक हे दुखापतीतून न सावरल्यामुळे त्यांचा संघनिवडीसाठी विचार होऊ शकलेला नाही.
मालिकेच्या दुसऱ्या टप्पाय टॉम लॅथम संघाचं नेतृत्व करणार आहे. तब्बल तीन वर्षांनंतर लॅथमचं टी२० संघात पुनरामगन झालं आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या कोचिंग टीमचा भाग असलेले जेकब ओरम आणि ल्यूक राँची हे पाकिस्तान सुपर लीगमधल्या इस्लामाबाद युनायटेड संघाचं प्रशिक्षकपद भूषवत असल्याने या मालिकेत नसतील.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनेही संघात घाऊक बदल केले आहेत. आफ्रिकेचं नेतृत्व फिरकीपटू केशव महाराजकडे सोपवण्यात आलं आहे. एडन मारक्रम, डेवाल्ड ब्रेव्हिस, क्विंटन डी कॉकी, डेव्हिड मिलर, रायल रिकलटन, ट्रिस्टन स्टब्ज, कार्बिन बॉश, मार्को यान्सन, कागिसो रबाडा, क्वेना मफाका, लुंगी एन्गिडी, अँनरिक नॉर्किया यांना विश्रांती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे कॉनर इस्टरहून, डिआन फोरेस्टर, जॉर्डन हरमन आणि नकोबानी मोकेना यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
टी२० वर्ल्डकप स्पर्धेत दमदार फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सेमी फायनलमध्ये अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडनेच दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवला होता.
