scorecardresearch

IND vs NZ : सामना संपताच न्यूझीलंडच्या चाहत्याकडून ‘भारत माता की जय’ची घोषणा

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रोहित शर्माने षटकार लगावत न्यूझीलंडच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रोहित शर्माने षटकार लगावत न्यूझीलंडच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला आणि भारताला मालिकेत ३-० ची विजयी आघाडी मिळवून दिली. सलग तिसऱ्या विजयासह भारताने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाचा मालिका जिंकण्याची करामत केली आहे. रोमहर्षक सामन्यात क्रिकेट चाहत्यांनी सुपर थरार पहायला मिळाला. अखेरच्या क्षणांमध्ये भारतीय चाहत्यांचा प्रचंड जल्लोष सुरु होता. सामना जिंकल्यानंतर भारतीय प्रेक्षक ‘भारत माता की जय’ घोषणा देत होते. यामध्ये एका न्यूझीलंडच्या चाहत्याचाही समावेश होता. न्यूझीलंडच्या चाहत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सामना जिंकल्यानंतर मैदानात प्रेक्षकांचा जल्लोष सुरु असताना न्यूझीलंडचा चाहता मागे बसलेल्या भारतीय चाहत्याकडून ‘भारत माता की जय’ शिकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या १६ सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सामन्याबद्दल बोलायचं गेल्यास मोहम्मद शामीने अखेरच्या षटकांत अप्रतिम गोलंदाजी करत न्यूझीलंडविरुद्धचा टी-२० सामना बरोबरीत राखल्यानंतर रोहित शर्माने सुपर ओव्हरमध्ये शेवट्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत भारताला अनपेक्षित विजय मिळवून दिला. सलग तिसऱ्या विजयामुळे मालिकेत ३-० अशी आघाडी घेणाऱ्या भारताने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाचा मालिका जिंकण्याची करामत केली.

दरम्यान, त्यापूर्वी सलामी फलंदाज रोहित शर्माचे अर्धशतक (६५) आणि कर्णधार विराट कोहली (३८) यांच्या खेळीच्या बळावर भारताने प्रथम फंलदाजी करताना निर्धारित २० षटकांत पाच बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली होती. तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रोहित शर्मा आणि के. एल. राहुलने भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. रोहित शर्मा-राहुलने ८९ धावांची भागिदारी केली. सलामीची जोडी फुटल्यानंतर भारताच्या ठराविक अंतराने विकेट पडल्या. शिवम दुबेला कोहलीनं तिसऱ्या स्थानावर बढती दिली. मात्र, याचा फायदा शिवमला घेता आला नाही.

धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला विजयासाठी अखेरच्या षटकात ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. तिसरा सामना न्यूझीलंडने जवळपास जिंकला होता. केन विल्यम्सन आणि रॉस टेलर मैदानात होते. पण शामीने भेदक गोलंदाजी करत पहिल्यांदा विल्यम्सनला बाद केले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना टेलरला बाद केले. २० षटकात दोन्ही संघांच्या समान धावा झाल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. विल्यम्सनने ४८ चेंडूत ९५ धावांची दमदार खेळी केली तर मार्टिन गप्टिलने ३१ धावांची खेळी केली. विल्यम्सन-गप्टिलशिवाय एकाही न्यूझीलंडच्या फलंदाजाला धावा काढता आल्या नाही. टेलर, मुनरो आणि सँटरला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि शामीनं प्रत्येकी दोन दोन बळी घेतले. चहल आणि जाडेजाला प्रत्येकी एक एक बळी मिळाला.

सुपर ओव्हरचा थरार
सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने विल्यम्सन आणि गप्तिल यांना पाचरण केले. लयीत नसलेल्या बुमराहने पहिल्या दोन चेंडूत दोन धावा दिल्या. त्यानंतर विल्यम्सयने एक षटकार आणि चौकार लगावत न्यूझीलंडची धावसंख्या वाढवली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव घेतल्यानतंर सहाव्या चेंडूवर गप्तिलने चौकार मारल्यामुले न्यूझीलंडने १७ धावा केल्या. भारताने रोहित आणि राहुल यांच्यावर विश्वास दाखवला. पहिल्या चेंडूवर दोन आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत रोहितने राहुलला फलंदाजीवर आणले. राहुलने चौकार लगावून पुढच्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताला दोन चेंडूत १० धावांची आवश्यकता असताना रोहितने साऊदीला दोन षटकार ठोकून भारताच्या विजयावर मोहोर उमटवली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New zealand fan bharat mata ki jai india vs new zealand t20i sgy