ब्रेन्डन मॅक्क्युलमचे त्रिशतक हा न्यूझीलंड क्रिकेटच्या कालखंडातील अद्वितीय क्षण होता. ८४ वर्षांच्या न्यूझीलंड क्रिकेटच्या वाटचालीत त्रिशतकाची उणीव होती. वेलिंग्टनच्या बेसिन रिझव्‍‌र्ह मैदानावर तसेच दूरचित्रवाणी संचांवर हा संस्मरणीय क्षण समस्त न्यूझीलंडवासियांनी अनुभवला. एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी जणू देशाने काही क्षणांची विश्रांती घेतली, अशा शब्दांत न्यूझीलंडचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी मॅक्क्युलमच्या खेळीचा गौरव केला.
हेसन पुढे म्हणाले, ‘‘या क्षणाने अतीव समाधान दिल्याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर न्यूझीलंडचा नागरिक म्हणून माझ्यासाठीही हा क्षण अनमोल होता. अनेक जण या घटनेने भारावून गेले आणि ते साहजिकच आहे. ब्रेन्डनने त्रिशतक पूर्ण करताच चाहत्यांच्या भावनांना उधाण आले. त्याची मॅरेथॉन खेळी प्रेक्षकही तितक्याच संयमाने पाहत होते. त्यामुळे त्रिशतक झाल्यावर त्यांनी साजरा केलेला आनंदोत्सव स्वाभाविक आहे.’’
‘‘तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅक्क्युलम थकलेला वाटत होता, मात्र त्रिशतक पूर्ण होताच त्याचा चेहरा उजळला. संघाला संकटातून बाहेर काढल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर होते,’’ असे हेसन यांनी पुढे सांगितले.

प्रसारमाध्यमांचा मॅक् क्युलमवर कौतुकाचा वर्षांव
वेलिंग्टन : ऐतिहासिक त्रिशतकासह न्यूझीलंडला पराभवाच्या संकटातून बाहेर काढणाऱ्या ब्रेन्डन मॅक् क्युलमवर न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांनी कौतुकाचा वर्षांव केला आहे. ‘कर्णधाराची दिमाखदार खेळी’ तसेच ‘अद्वितीय खेळी’ असे प्रशंसोद्गार मॅक् क्युलमच्या खेळीचे वर्णन करणारे आहेत.
‘इतिहास रचणारी’ आणि ‘आयुष्यभरासाठीची कालातीत खेळी’ अशा शब्दांमध्ये ‘डॉमिनिऑन पोस्ट’ने मॅक् क्युलमच्या खेळीविषयी म्हटले आहे. ‘‘बेसिन रिझव्‍‌र्ह मैदान परिसरातल्या इमारतींवर मॅक् क्युलमचे त्रिशतक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. ख्रिसमस दिनाच्या दिवसासारखा उत्साह वातावरणात होता. रिचर्ड हॅडलीने कसोटी क्रिकेटमध्ये घेतलेल्या ३०० बळींच्या क्षणानंतर पहिल्यांदाच असे जल्लोषी वातावरण होते,’’ असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. न्यूझीलंडतर्फे साकारलेली सर्वोत्तम खेळी असे ‘न्यूझीलंड हेराल्ड’ने म्हटले आहे.
ब्रेन्डन मॅक्् क्युलमला साथ देणाऱ्या ब्रॅडले वॉटलिंग आणि जिमी नीशाम यांच्या शतकी खेळीचे प्रसारमाध्यमांनी कौतुक केले आहे. भारतासारख्या बलाढय़ संघाला एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत चीतपट करण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल स्थानिक प्रसारमाध्यमांनी संपूर्ण संघाचे भरभरून कौतुक केले आहे.