भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार असलेल्या मिचेल सँटनरने मालिकेतील पराभवावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारत हा असा संघ आहे ज्याला घरच्या मैदानावर हरवणे सोपे काम नाही, असे सँटनरने म्हटले आहे. 

कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी -२० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १७.२ षटकांत १११ धावांवर गारद झाला. भारतीय संघाकडून अक्षर पटेलने तीन बळी घेतले. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी -२० मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला. किवी संघाला एकही सामना जिंकता आला नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय संघाने तिन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला. मालिकेतील पराभवाबाबत सँटनर म्हणाला, “भारताने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. विशेषतः अक्षर पटेलचा स्पेल खूप चांगला होता. पॉवरप्लेमध्ये तुम्ही तीन विकेट गमावता तेव्हा तिथून परतणे सोपे नसते. भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळला त्याचे संपूर्ण श्रेय त्याला जाते. माझ्या मते, संपूर्ण मालिकेत आम्ही त्या लयीत दिसलो नाही. भारताचा हा संघ खूप चांगला आहे आणि त्यांना घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नाही. अनेकवेळा आम्ही मालिकेत पुढे होतो पण त्यांनी परत येऊन आमच्यावर दबाव आणला.”