राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आयपीएल क्वॉलिफायर २ सामना काल (२७ मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. क्वॉलिफायर २ सामन्यात राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थानने दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. विजेतेपद मिळवण्यासाठी राजस्थान रॉयल्सला रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला टक्कर द्यावी लागणार आहे. १४वर्षांच्या अंतरानंतर राजस्थानचा संघ अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्यामुळे संघ मालक, चाहते आणि खेळाडू सर्वजण आनंदामध्ये आहेत. मात्र, याच गोष्टीमुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची चिंता वाढली आहे. आता राजस्थान रॉयल्स आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा काय संबंध? असा आपल्याला प्रश्न पडणं साहजिक आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर सध्या राजस्थानच्या संघासोबत अंतिम सामन्याची तयारी करत आहे!

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आयपीएल २०२२ टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात आतापर्यंत बोल्टची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने १५ सामन्यात १५ बळी घेतले आहेत. जेव्हा नवीन चेंडूचा वापर होतो तेव्हा बोल्ट विशेष प्रभावी ठरत आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायरमध्येही बोल्टने चार षटकात केवळ २८ धावा दिल्या आणि ग्लेन मॅक्सवेलसारख्या स्फोटक फलंदाजाला बाद केले.

सांघिक प्रयत्नांच्या जोरावर राजस्थानचा संघ आता अंतिम फेरीत पोहोचला आहे. विजेतेपदासाठीचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. यादरम्यान, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघही इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. २ जूनपासून दोन्ही देशांमधील पहिली कसोटी लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. म्हणजेच आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडला संघ इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी खेळण्यासाठी उतरणार आहे. अशा स्थितीत ट्रेंट बोल्टला कसोटीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे तो या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये खेळणार आहे की नाही याबाबत अनिश्चितता आहे.

ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाकडे टीम साऊथी, काईल जेमिसन, नील वॅगनर, मॅट हेन्री आणि एजाज पटेल या पर्याय उपलब्ध असतील. तरी देखील न्यूझीलंडच्या संघाला बोल्ट नसल्याचा तोटा होऊ शकतो. कारण इंग्लिश संघाविरुद्ध ट्रेंट बोल्टची कामगिरी फारच चांगली आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या ११ कसोटी सामन्यांमध्ये ५४ बळी घेतले आहेत. जर राजस्थान रॉयल्स अंतिम सामन्यात पोहचले नसते तर ट्रेंट बोल्ट आज न्यूझीलंडच्या संघात दाखल झाला असता.