दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी आपण थकलो असल्याची कबुली देत त्याने या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यानंतर आता न्यूझीलंडच्या एका खेळाडूने भावनिक ट्विट करून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. तो खेळलेल्या विविध क्लबच्या आणि न्यूझीलंड संघाच्या टोप्या एका दोरीवर लावून त्याने हि भावनिक घोषणा केली आहे.

न्यूझीलंडचा सलामीवीर रॉब निकोल याने आपल्या ट्विटर हॅण्डल वरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आज सकाळी त्याने टोप्यांच्या फोटोसह एक ट्विट केले असून त्यात ‘(सगळं) संपलं’ असा भावनिक संदेश लिहिला आहे. या फोटोमध्ये ५ टोप्या लटकवलेल्या दिसत असून त्यात एक टोपी न्यूझक्सिलँडच्या संघाचीही आहे. ती टोपी त्याने मध्यभागी ठेवली आहे.

३५ वर्षीय रॉबने २२ एकदिवसीय, २१ टी २० आणि २ कसोटी सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने एकूण ९४१ धावा केल्या असून त्यात २ शतकांचा समावेश आहे. तसेच, टी २० क्रिकेटमध्येही त्याने अष्टपैलू खेळाडूची भूमिका उत्तमप्रकारे पार पाडली. त्यात पहिले शतक हे त्याने पदार्पणाच्या सामन्यात केले होते.