भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर भारताविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघात पाच फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू कॉलिन डीग्रँडहोम यांनी या मालिकेतून माघार घेतली आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात येणार असून त्यानंतर २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने जैव-सुरक्षित वातावरणात राहावे लागल्याने बोल्ट आणि डीग्रँडहोम यांनी स्वत:हूनच या मालिकेत न खेळण्याबाबतचा प्रस्ताव न्यूझीलंड क्रिकेट मंडळापुढे ठेवला होता. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दोन्ही खेळाडूंच्या निर्णयाचा आदर राखतानाच अन्य युवा खेळाडूंनी या संधीचा लाभ उचलावा, असे मत व्यक्त केले.

एजाझ पटेल, मिचेल सँटनर, विल सोमरविले, रचिन रविंद्र आणि ग्लेन फिलिप्स असे पाच फिरकीचे पर्याय न्यूझीलंडकडे उपलब्ध आहे. मुंबई येथे ३ डिसेंबरपासून उभय संघांतील दुसरी कसोटी खेळवण्यात येईल.

न्यूझीलंडचा संघ

केन विल्यम्सन (कर्णधार), डेवॉन कॉन्वे, टॉम ब्लंडेल, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, कायले जेमिसन, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साऊदी, विल यंग, नील वॅगनर, एजाझ पटेल.