ICC T20 World Cup 2026 Final India vs New Zealand: बोचरे वारे, थंडगार हवा, चेंडूला मिळणारा प्रचंड स्विंग हे न्यूझीलंडमधलं नेहमीचं वातावरण. यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना भारतात खेळणं नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे. प्रचंड उकाडा, आर्द्रता, फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या, चाहत्यांचा भारतीय संघाला आवाजी पाठिंबा, वेगळं खानपान यामुळे न्यूझीलंडसाठी भारत दौरा नेहमीच खडतर समजला जातो. मात्र हे सगळे अडथळे आणि आव्हानं पार करत न्यूझीलंडच्या संघाने २०२४ मध्ये भारतात एक अद्भुत पराक्रम केला. बलाढ्य आणि घरच्या मैदानावर अजिंक्य म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय संघाला न्यूझीलंडने चारीमुंड्या चीतपट केलं. बंगळुरू, पुणे आणि मुंबई अशा सलग तीन कसोटीत न्यूझीलंडने बाजी मारली आणि निर्भेळ यश साजरं केलं. न्यूझीलंडचा संघ १९५५ पासून भारतात कसोटी मालिकांसाठी येतो आहे. याआधीच्या दौऱ्यांमध्ये ३६ कसोटीत त्यांना फक्त २ विजय मिळवता आले होते. तो सगळा बाजूला सारत न्यूझीलंडने सगळ्यांनाच धक्का दिला.
त्या मालिकेत भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांचा समावेश होता.रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन ही जोडगोळीही खेळली होती. या पराभवाचा परिणाम म्हणजे रवीचंद्रन अश्विनने काही महिन्यात क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडच्या संघाने त्या मालिकेत फिरकीचा चांगल्या प्रकारे सामना केला. मिचेल सँटनर, ग्लेन फिलीप्स, एजाज पटेल यांच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरले. मॉट हेन्री, टीम साऊदी आणि विल्यम ओ रुक या वेगवान गोलंदाजी त्रिकुटाने भारतीय फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्या मालिकेत खेळलेले अनेक खेळाडू टी२० वर्ल्डकपची फायनल खेळणार आहेत. यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर, डेव्हॉन कॉनवे, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलीप्स, रचीन रवींद्र, जेकब डफी, मॉट हेन्री यांचा समावेश आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर कशी फलंदाजी करावी याचा वस्तुपाठ विल यंगने सादर केला होता. न्यूझीलंडची मधली फळी टी२० वर्ल्डकपमध्ये धावांसाठी झगडताना दिसत आहेत. ते यंगकडून प्रेरणा घेऊ शकतात.
त्या मालिकेत खेळलेल्या भारतीय खेळाडूंपैकी कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर हे टी२० वर्ल्डकप संघात आहेत. त्या मालिकेत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी बुमराहला वरचढ होऊ दिलं नाही. न्यूझीलंड संघाकडे विजिगीषु वृत्ती अशी टीका नेहमी होते. मात्र या मालिकेत त्यांनी एकाही क्षणी भारतीय संघाला सरशी साधू दिली नाही. ज्या ज्या वेळी भारतीय फलंदाज भागीदारी रचत, त्या त्या वेळी न्यूझीलंडचे गोलंदाज हमखास विकेट मिळवत. भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना गडबडतात हे या मालिकेने सिद्ध केलं. न्यूझीलंडसाठी हा मुंबई कसोटीत भारतीय संघ लक्ष्यापासून फार दूर नव्हता मात्र न्यूझीलंडच्या खेळाडूंनी टिच्चून मारा करत विजयश्री खेचून आणली. दीड वर्षापूर्वी झालेली ही मालिका न्यूझीलंडसाठी अचूक उदाहरण ठरू शकते.
न्यूझीलंडच्या संघाने भारतभूमीवर ७४ वनडे सामने खेळले आहेत. यापैकी केवळ २५ मध्ये त्यांना विजय मिळू शकला आहे तर ४७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतात खेळलेल्या २५ टी२० सामन्यांमध्ये न्यूझीलंडने १२ विजय मिळवले आहेत तर १३ मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. ५०-५० असं हे समीकरण आहे.
अहमदाबाद इथे खेळलेल्या दोन सामन्यात न्यूझीलंडला पराभवचाच सामना करावा लागला आहे. २०२३ मध्ये या मैदानावर झालेल्या लढतीत भारतीय संघाने २३४ धावांची मजल मारली. शुबमन गिलने १२६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा डाव ६६ धावांतच आटोपला. हार्दिक पंड्याने ४ तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
यंदाच्या टी२० वर्ल्डकपमध्ये या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडचा पराभव झाला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावांची मजल मारली. मार्क चॅपमनने ४८ तर डॅरेल मिचेलने ३२ धावांची खेळी केली. आफ्रिकेतर्फे मार्को यान्सनने ४ विकेट्स पटकावल्या. कर्णधार एडन मारक्रमच्या नाबाद ८६ धावांच्या खेळीच्या बळावर आफ्रिकेने ७ विकेट्सने विजय साकारला.
या मैदानावर खेळलेल्या तीन वनडेत न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. योगायोग म्हणजे या मैदानावर खेळलेल्या तिन्ही कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
