न्यूझीलंडचा संघ टी२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू जेमी नीशाम न्यूझीलंड संघाचा भाग आहे. सलग तीन पराभवांसह न्यूझीलंडने मालिका गमावली. न्यूझीलंडला अनुभवी खेळाडूची आवश्यकता आहे मात्र नीशाम संघाबरोबर नाही. तो चक्क बांगलादेशात आहे.

जेमी नीशामने न्यूझीलंड क्रिकेटचा वार्षिक करार स्वीकारला नाही. त्यामुळे प्रत्येक मालिकेपूर्वी तो त्याची उपलब्धता संघाला कळवतो. बाकी खेळाडूंची स्वाभाविक निवड होते. मात्र नीशामला ते लागू होत नाही. विशिष्ट मालिकेसाठी तो उपलब्ध असेल तरच त्याची निवड केली जाते.

भारत दौऱ्यावर असणाऱ्या टी२० संघात नीशामची निवड झाली. मात्र तो बांगलादेश प्रीमिअर लीगचा भाग आहे. तो राजशाही वॉरियर्स संघाकडून खेळतो. वॉरियर्स व्यवस्थापनाने नीशामला खेळत राहण्याची विनंती केली. राजशाही वॉरियर्स संघाने बाद फेरीत प्रवेश केला होता. नीशामचा अनुभव त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार होता. मात्र त्याचवेळी भारतात खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला नीशामची उणीव भासणं साहजिक होतं. नीशामने न्यूझीलंडऐवजी राजशाही संघाची निवड केली.

राजशाहीचे संघाचे प्रशिक्षक हनन सरकार यांनी नीशामला खेळत राहण्याची वैयक्तिक विनंती केली. त्यांनी यासंदर्भात न्यूझीलंड क्रिकेटशी संपर्क केला. त्यांच्याकडून नीशामसाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवलं. जेणेकरून त्याचा बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याचा मार्ग सुकर होईल. हनन यांच्या प्रयत्नांमुळे नीशाम रविवारी झालेल्या बांगलादेश प्रीमिअर लीगच्या अंतिम लढतीत खेळू शकला.

नीशामने अंतिम लढतीत ७ धावा केल्या. गोलंदाजी करताना ४ षटकात अवघ्या २४ धावांच्या मोबदल्यात त्याने २ विकेट्स पटकावल्या.

राजशाही संघाचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आलं तर नीशाम २२ जानेवारी भारतासाठी रवाना होणार होता. मात्र हनन यांच्या पाठपुराव्यामुळे नीशाम बांगलादेश प्रीमिअर लीगची अंतिम लढत खेळला आणि त्यानंतर भारतासाठी रवाना झाला. या निर्णयामुळे नीशाम भारताविरुद्धच्या तीन टी२० लढती खेळू शकला नाही.

न्यूझीलंडने या तिन्ही लढती गमावून मालिकाही गमावली. उर्वरित दोन लढतींसाठी नीशाम उपलब्ध आहे. विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम इथे या लढती होणार आहेत. टी२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची होती. भारतीय संघाने दमदार सांघिक प्रदर्शन करत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला.

नीशामने १२ टेस्ट, ७६ वनडे आणि ९३ टी२० सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. जगभरात आयोजित होणाऱ्या विविध टी२० लीग स्पर्धेत तो सातत्याने खेळतो. दुबई कॅपिटल्स, अजमन बोल्ट्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, एडमॉन्टन रॉयल्स, गयाना अमेझॉन वॉरियर्स, होबार्ट हरिकेन्स, इस्लामाबाद युनायटेड, जाफना किंग्ज, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, मिसियुंगा पँथर्स, मुंबई इंडियन्स, नॉदर्न वॉरियर्स, ओव्हल इनव्हिसिबल्स, पेशावर झाल्मी, प्रिटोरिया कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, राजशाही वॉरियर्स, रंगपूर रायडर्स, त्रिनबागो नाईट रायडर्स, वेल्श फायर या संघांकडून खेळतो. फ्रीलान्स क्रिकेटपटू म्हणून त्याने ओळख प्रस्थापित केली आहे.

२०१९ मध्ये न्यूझीलंडच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या वाटचालीत नीशामचा मोलाचा वाटा होता.