फ्यूचर टूर्स प्रोग्रामचा (FTP) भाग म्हणून न्यूझीलंड क्रिकेट संघ २०२२ ते २०२३ मध्ये दोनदा पाकिस्तान दौरा करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने यांची माहिती दिली. FTP नुसार, न्यूझीलंड संघ डिसेंबर/जानेवारी २०२२/२३मध्ये दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करेल आणि त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी एप्रिल २०२३ मध्ये पाकिस्तानला परत भेट देईल. सप्टेंबर २०२१ मध्ये रद्द झालेल्या दौऱ्याची भरपाई करण्यासाठी ती मालिका खेळवली जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी याची घोषणा केली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले, ”पीसीबी आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा आणि मार्टिन स्नेडेन यांच्यातील बैठका आणि चर्चेनंतर वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने अनुक्रमे आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग असतील, तर दुसऱ्या दौर्‍यात दोन अतिरिक्त एकदिवसीय सामने खेळले जातील. यावेळी पाच एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आयसीसी क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंड मर्यादित षटकांच्या मालिकेत भिडतील. अशाप्रकारे आता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे.”

हेही वाचा – IND vs SA : कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच चाहत्यांना धक्का; वाचा नक्की घडलंय काय?

पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांनी म्हटले, “आमच्या चर्चेच्या आणि वाटाघाटींच्या परिणामांमुळे मी खूश आहे. मार्टिन स्नेडेन आणि त्यांच्या मंडळाचे मी आभार मानतो. हे दोन्ही मंडळांमधील मजबूत, सौहार्दपूर्ण आणि ऐतिहासिक संबंध प्रतिबिंबित करते.”