New Zealand vs Canada: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ३१ वा सामना कॅनडा आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला.हा सामना चेन्नईतील एम ए चिंदबरम स्टेडियममध्ये पार पडला. चेन्नईत सकाळच्या सत्रात सामना खेळणं मुळीच सोपं नाही. उकाड्यामुळे गोलंदाजांचा चांगलाच कस लागतो. त्यामुळे फलंदाजांना फायदा होतो. याच संधीचा फायदा घेत, कॅनडाचा सलामीवीर फलंदाज युवराज सामराने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. या खेळीच्या बळावर कॅनडाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४ गडी बाद १७३ धावा केल्या. पण युवराजची शतकी खेळी व्यर्थ गेलं आहे. कारण दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ग्लेन फिलिप्सने दमदार अर्धशतकी खेळी करून न्यूझीलंडला ८ गडी राखून विजय मिळवून दिला. यासह न्यूझीलंडने स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे.

युवराज सामराचं शतक व्यर्थ

या सामन्यात कॅनडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कॅनडाकडून सलामीला आलेल्या युवराज सामराने ६५ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. तर कर्णधार दिलप्रीत बाजवाने ३९ चेंडूत ३६ धावा केल्या. नवजीत धलीवालने १० धावा केल्या. या खेळीच्या बळावर कॅनडाने ४ गडी बाद १७३ धावा केल्या.

न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी १७४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला लागोपाठ २ मोठे धक्के बसले. संघाची धावसंख्या ३० धाव असताना आधी टीम सेफर्ट ६ अवघ्या ६ धावा करत माघारी परतला. तर फिल अॅलेने २१ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रचिन रवींद्रने आणि ग्लेन फिलिप्सची जोडी शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहिली. दोघांनी मिळून १४६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. यादरम्यान रचिन रवींद्रने ३९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५९ धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने ३६ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ७६ धावांची खेळी केली.

न्यूझीलंडचा सूपर ८ मध्ये प्रवेश

या विजयासह न्यूझीलंडने सुपर८ मध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडचा संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत प्रवेश करणारा सहावा संघ ठरला आहे. या विजयासह कॅनडा आणि अफगाणिस्तानचा संघ देखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेतील ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. ६ गुणांसह हा संघ दुसऱ्या स्थानी आहे.