इंग्लंड-न्यूझीलंड  ट्वेन्टी-२० मालिका

अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमच्या घणाघाती खेळीमुळे न्यूझीलंडने इंग्लंडवर २१ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

रविवारी वेलिंग्टन मैदानावर झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. या संधीचा फायदा उचलत न्यूझीलंडचे फलंदाज मार्टिन गप्टील (२८ चेंडूत ४१ धावा), जेमी नीशाम (२२ चेंडूत ४२ धावा)आणि कॉलिन डी ग्रँडहोम (१२ चेंमूडत २८ धावा) यांच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडने २० षटकांत ८ बाद १७६ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने तीन फलंदाजांना माघारी धाडले.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला भापळाही फोडता आला नाही. पहिल्याच चेंडूवर टिम साऊदीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मॉर्गन (३२ धावा), डेव्हिड मालान (३९ धावा) आणि ख्रिस जॉर्डन (३६ धावा) यांनी प्रतिकार केला, पण ते पराभव टाळू शकले नाहीत. अन्य फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे इंग्लंडला २१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडकडून मिचेल सान्तनेरने सर्वाधिक तीन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १७६ (मार्टिन गप्तिल ४१, कॉलिन डे ग्रँडहोम २८, रॉस टेलर २८; ख्रिस जॉर्डन ३/२३) विजयी वि. इंग्लंड : १९.५ षटकांत सर्व बाद १५५ (डेव्हिड मालान ३९, ख्रिस जॉर्डन ३६, इऑन मॉर्गन ३२; मिचेल सान्तनेर ३/२५).

सामनावीर : मिचेल सान्तनेर.