जागतिक हॉकी लीग स्पर्धा
आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडय़ा बळकट करण्याचे उद्दिष्ट असलेल्या भारतासमोर जागतिक हॉकी लीग स्पर्धेत तिसऱ्या फेरीत न्यूझीलंडचे आव्हान आहे. आर्यलडविरुद्ध गुण मिळवण्याची संधी वाया गेल्यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीतही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या सुमार कामगिरीमुळे पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या भारतीय संघाच्या आशा धुसर झाल्या आहेत. मात्र न्यूझीलंडवर विजय मिळवल्यास उपांत्यपूर्व फेरीआधी भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावू शकतो.
भारताने आर्यलडविरुद्धची लढत ४-४ बरोबरीत सोडवली होती. या सामन्यात भारताची बचाव फळीची मर्यादा स्पष्ट झाली होती. नेदरलँड्सविरुद्ध बचाव फळीने कामगिरीत सुधारणा केली मात्र आघाडीपटूंनी लौकिलाला साजेशी कामगिरी न केल्याने भारताला फटका बसला.
पहिल्या सामन्यात मधली फळी आणि आघाडीपटू यांच्यात समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले होते. याशिवाय प्रतिस्पध्र्याना सहजपणे चेंडू सोपवणेही संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरले होते.
नेदरलँड्सच्या आक्रमक आणि वेगवान हालचालींना रोखणे भारतीयांना कठीण गेले. दुसरीकडे न्यूझीलंडने आर्यलडचे आव्हान मोडून काढत विजय मिळवला आहे.
भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने दोन गोल वाचवत शानदार कामगिरी केली होती. ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यासाठी उत्सुक आहे तर कर्णधार सरदारा सिंगवर मधल्या फळीची जबाबदारी असणार आहे. आकाशदीप सिंग आणि अनुभवी शिवेंद्र सिंग यांच्यावर गोल करण्याची भिस्त आहे.