Neymar Jr confronts fans after Santos win Copa do Brasil: ब्राझीलचा स्टार खेळाडू ज्युनियर नेयमार नव्या वादात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर नेयमार ब्राझीलमधील देशांतर्गत स्पर्धा कोपा दो ब्राझिल स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत नेयमार सँटोस संघाचा भाग आहे. सँटोसला कोपा दो ब्राझिलच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचविल्यानंतर त्याची रेमोच्या चाहत्यांशी आणि खेळाडूंशी जोरदार शाब्दिक चकमक झाली. नेयमार चाहत्यांवर संतापत त्यांना शिव्या घालत चिडवताना दिसला, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
उपांत्यपूर्व फेरीचा सामना रेमो आणि सँटोस यांच्यात खेळवला गेला. सामना संपल्यानंतर मैदानावरील वातावरण तापलं आणि नेयमारचा रेमोच्या खेळाडू तसेच समर्थकांशी वाद झाल्याचं दिसून आलं. सँटोसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतरही ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू पुन्हा एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. नेयमारने केलेल्या कमालीच्या असिस्टमुळे सँटोस संघाला एक गोल करता आला. ज्यामुळे संघाने १-० असा दणदणीत विजय मिळवला.
मंगुएराओ स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात सँटोसने १-० असा विजय मिळवत कोपा दो ब्राझिलच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलं. मात्र अंतिम शिट्टी वाजताच मैदानावर तणावपूर्ण आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विजयानंतर नेयमार थेट रेमोच्या राखीव खेळाडूंच्या बाकाकडे आणि चाहत्यांकडे गेला. त्याने वारंवार “एलिमिनेट” असं ओरडत त्यांना चिडवताना दिसला. यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये वातावरण तापलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये नेयमार ड्रेसिंग रूमकडे जाणाऱ्या भागात रेमोचे काही समर्थक उभे होते, जे तो दिसताच त्याची हुर्याे उडवत होते आणि नेयमारने पाहताच तो काही चाहत्यांना चिडवताना दिसत आहे. नेयमार चाहत्यांना पाहून चांगलाच संतापलादेखील होता आणि त्यांना शिव्या घालत तो वैतागताना दिसला. पुढे जाऊन नेयमार नाचत आणि सँटोसच्या लोगोची खूण दाखवत चाहत्यांना चिडवत होता. त्यानंतर दरवाज्याजवळ पोहोचताच नेयमार नाचत एलिमिनेट एलिमिनेट म्हणत रेमोच्या चाहत्यांना डिवचताना दिसला.
नेयमार चिडवताना पाहून सुरक्षा बॅरिकेड ढकलत चाहते पुढे सरसावताना दिसत होते. पण तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याला रोखलं. काही जणांनी तर बॅरिकेडही ढकलून खाली पडले. तितक्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नेयमारला आत नेलं. या संपूर्ण प्रसंगाचा व्हीडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेयमारने फिफा विश्वचषक २०२६च्या उपउपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलच्या पराभवानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती. सँटोसबरोबरचा नेयमारचा करार यावर्षी डिसेंबरमध्ये संपणार आहे.
