पाच वेळा विश्वविजेत्याचा मान पटकावणाऱ्या ब्राझील संघाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या पहिल्याच लढतीत जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानावर असलेल्या पेरू संघाने विजयासाठी झुंजवले. सामना संपण्याच्या अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत ही लढत १-१ अशा बरोबरीत सुटेल आणि ब्राझीलला एका गुणावरच समाधान मानावे लागेल अशी चिन्हे होती. मात्र, कर्णधार नेयमारने ९०व्या मिनिटाला पेरूच्या चार खेळाडूंना चकवून अगदी चतुराईने चेंडू डोउग्लास कोस्टा याच्याकडे टोलवला. पुढील जबाबदारी कोस्टाने अचूकपणे पार पाडत ब्राझीलच्या विजयावर २-१ अशी मोहोर उमटवली.
जागितक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या ब्राझीलला लढतीपूर्वीच विजयाचे प्रमुख दावेदार मानले होते. परंतु, तुलनेने कमकुवत असलेल्या पेरूचा खेळ पाहून मतपरिवर्तन झाले. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला ख्रिस्टियान क्युवास याने तणावाखालीही अप्रतिम खेळ करताना ब्राझीलची बचावफळी तोडून पेरूसाठी पहिला गोल नोंदविला. हा आनंद त्यांना फार काळ साजरा करता आला नाही. पुढच्याच मिनिटाला डॅनिस अल्वेस याने कॉर्नरवरून टोलावलेला चेंडू नेयमारने हेडरद्वारे गोलजाळीत टाकला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. या बरोबरीचे कोणतेही दडपण न घेता पेरूच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा वापरत सामन्यावर पकड घेतली होती. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत सामना बरोबरीत सुटेल असेच चित्र होते, परंतु यंदाच्या सत्रात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या नेयमारने पेरूच्या बचावपटूंना चकवा देत चेंडू जास्तीत जास्त काळ स्वत:कडे ठेवून गोल करण्याचा प्रयत्न केला. त्याला कोस्टाकडून योग्य साथ मिळाली आणि ब्राझीलने ओढावणारी नामुष्की दूर केली.

व्हेनेझुएलाकडून कोलंबियाला धक्का
* ब्राझीलहून वरचढ असलेल्या कोलंबियाला मात्र पहिल्याच लढतीत व्हेनेझुएलाकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
* सॅलोमोन रोंडॉनच्या व्हेनेझुएलाने २०१४च्या विश्वचषक स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या कोलंबियाचा १-० असा पराभव केला.
* ६०व्या मिनिटाला रोंडॉनने केलेल्या गोलने व्हेनेझुएलाला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
* जेम्स रॉड्रिग्ज, रॅडमेल फल्काओ आणि जुआन क्वाड्राडो हे युरोपियन लीग स्पध्रेतील प्रमुख खेळाडू असूनही कोलंबियाचा हा पराभव आश्चर्यकारक म्हणावा लागेल.

* ११ विश्वचषक स्पध्रेनंतर ब्राझीलचा हा सलग ११वा विजय आहे.
* ४४ या सामन्यातील गोलबरोबर २३ वर्षीय नेयमारने आपल्या खात्यात ४४ आंतरराष्ट्रीय गोल्स जमा केले आहेत. ब्राझीलचे दिग्गज पेले यांनी हा पल्ला वयाच्या २४व्या वर्षी पार केला होता.
* हा विजय महत्त्वाचा होता. गोल करून, गोल करण्यात मदत करून आणि सर्वकाही ज्याने संघाच्या विजयात योगदान होईल, त्यासाठी मला विक्रम प्रस्थापित करायचे आहेत. – नेयमार

बुधवारच्या लढती
पॅराग्वे विरुद्ध जमैका
वेळ : मध्यरात्री २:३० वाजता
अर्जेटिना विरुद्ध उरुग्वे
वेळ : पहाटे ५ वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स एचडी, सोनी किक्स