ब्राझील संघाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेत पुढील सामने कर्णधार नेयमारशिवाय खेळावे लागणार आहेत. नेयमारवरील चार सामन्यांच्या बंदीविरोधात ब्राझिलियन फुटबॉल महासंघाने (सीबीएफ) दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे नेयमार कोपा अमेरिकाच्या उर्वरित सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे. कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलला १-० असा पराभव पत्करावा लागला होता आणि त्या सामन्यात नेयमारने कोलंबियाचा खेळाडू जेसन मुरील्लो याच्याशी गैरवर्तणूक केली होती. त्याच्या या वर्तणुकीमुळे त्याला लाल कार्डही दाखविण्यात आले होते. त्यानंतर त्याने सामनाधिकारी एन्रीक ओसेस यांच्याशी वाद घातला. त्यामुळे त्याच्यावर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. याविरोधात सीबीएफने रविवारी याचिका दाखल केली, परंतु सोमवारी ती मागे घेतली.
‘‘नेयमार आणि ब्राझीलचे सहयोगी प्रशिक्षकांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही याचिका मागे घेण्याचा निर्णय सीबीएफने घेतला,’’ अशी माहिती सीबीएफने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.