ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू निक मॅडिन्सनशी गोष्ट कोणत्याही माणसासाठी प्रेरणादायी ठरावी अशीच. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत देत निक मॅडिन्सनने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं. मात्र हे पुनरागमन निकसाठी दुस्वप्न ठरलं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील डरबान कसोटी आजपासून सुरू झाली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेडच्या साथीने निक मॅडिन्सन सलामीला उतरला. तब्बल १० वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या निकने ३३ चेंडूंचा सामना केला. मात्र त्याला खातं उघडता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेचा उंचपुरा डावखुरा गोलंदाज मार्को यान्सनच्या उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळण्याचा निकचा प्रयत्न स्टंप्सवर जाऊन आदळला. ३३ चेंडू खेळूनही निकला एकही धाव करता आली नाही.

सँडपेपर गेट प्रकरणानंतर ८ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाकडे राखीव खेळाडूंची दमदार फौज नसल्याने निवडसमितीने मालिकेपूर्वी काही धाडसी निर्णय घेतले. माजी कर्णधार जॉर्ज बेली आता ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीचे प्रमुख आहेत. बेली यांच्या नेतृत्वातील समितीने गेल्या दीड वर्षात डोमेस्टिक क्रिकेट न खेळलेल्या निक मॅडिन्सनला संघात घेण्याचा निर्णय घेतला. टेस्टिक्युलर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झगडत असल्यामुळे निकला कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळता आलं नाही.

मॅडिन्सनने २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी तीन कसोटी सामने खेळले होते, त्यानंतर तो कसोटी संघातून बाहेर फेकला गेला. २०२५ मध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरसाठी उपचार आणि केमोथेरपी घेतल्यानंतर त्याने एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही; तरीही, त्याची अलीकडील कामगिरी आणि अनुभव लक्षात घेऊन निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दर्शविला आहे.

केमोथेरपी पूर्ण केल्यानंतर, मॅडिनसनने २०२५-२६ च्या हंगामात ‘बिग बॅश लीग’ (BBL) मध्ये ‘सिडनी थंडर’साठी आणि ‘न्यू साउथ वेल्स सेकंड इलेव्हन’साठी सामने खेळले; मात्र, तो ‘शेफील्ड शील्ड’मध्ये खेळला नाही. गेल्या महिन्यातच त्याची ‘न्यू साउथ वेल्स’च्या ‘शेफील्ड शील्ड’ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या स्पर्धेचा नवीन हंगाम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मात्र त्याच्या आधीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. दरम्यान, कसोटी संघातील निवडीपूर्वीच, ‘वन-डे कप’मध्ये व्हिक्टोरियाविरुद्ध धडाकेबाज शतक (१२६ धावा) झळकावून मॅडिनसनने आपली तंदुरुस्ती आणि उत्कृष्ट फॉर्म सिद्ध केला होता.

बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंग्लिसला कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनला या सामन्यात खेळू शकणार नाहीये. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा या सामन्यात खेळत नाहीये. रबाडाने सामन्यापूर्वी सराव केला मात्र पुनरागमनाची घाई न करता त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ देण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाने घेतला. वेगवान गोलंदाज अँनरिक नॉर्किया साडेतीन वर्षानंतर कसोटी खेळत आहे.