Australia Test Squad Announcement South Africa Series Nic Maddinson Comeback: ऑस्ट्रेलियाई क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये १० वर्षांनी कसोटी संघात खेळाडूचं पुनरागमन झालं आहे, ज्याने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज दिली. त्याशिवाय एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या विकेटकिपर फलंदाजालाही संधी दिली आहे.

डावखुरा फलंदाज निक मॅडिसन याचं ऑस्ट्रेलियन संघात दमदार पुनरागमन झालं आहे. ‘टेस्टिक्युलर कॅन्सर’ सारख्या जीवघेण्या आजारावर मात केल्यानंतर मॅडिसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यास सज्ज झाला आहे. मॅडिसनबरोबर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या यष्टिरक्षक-फलंदाज सॅम हार्परचाही कसोटी संघात समावेश केला आहे.

मॅडिनसनने २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी तीन कसोटी सामने खेळले होते, त्यानंतर तो कसोटी संघातून बाहेर राहिला. २०२५ मध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरसाठी उपचार आणि केमोथेरपी घेतल्यानंतर त्याने एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही; तरीही, त्याची अलीकडील कामगिरी आणि अनुभव लक्षात घेऊन निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दर्शविला आहे.

केमोथेरपी पूर्ण केल्यानंतर, मॅडिनसनने २०२५-२६ च्या हंगामात ‘बिग बॅश लीग’ (BBL) मध्ये ‘सिडनी थंडर’साठी आणि ‘न्यू साउथ वेल्स सेकंड इलेव्हन’साठी सामने खेळले; मात्र, तो ‘शेफील्ड शील्ड’मध्ये खेळला नाही. गेल्या महिन्यातच त्याची ‘न्यू साउथ वेल्स’च्या ‘शेफील्ड शील्ड’ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या स्पर्धेचा नवीन हंगाम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. दरम्यान, कसोटी संघातील निवडीपूर्वीच, ‘वन-डे कप’मध्ये व्हिक्टोरियाविरुद्ध धडाकेबाज शतक (१२६ धावा) झळकावून मॅडिनसनने आपली तंदुरुस्ती आणि उत्कृष्ट फॉर्म सिद्ध केला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप न खेळलेल्या यष्टिरक्षक-फलंदाज सॅम हार्परची राष्ट्रीय कसोटी संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. हार्पर सध्या ऑस्ट्रेलिया-अ संघाचा भाग असून, हा संघ भारतात बारत-अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिका खेळत आहे. पुद्दुचेरी येथे झालेल्या दुसऱ्या चार-दिवसीय सामन्यात त्याने शानदार शतक झळकावलं; त्यामुळे, राष्ट्रीय कसोटी संघात सामील होण्यासाठी तो थेट भारतातून दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल.

दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियन संघाला हे अचानक बदल करावे लागले आहेत. बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंग्लिसला कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. दरम्यान, बुधवारी खेळल्या गेलेल्या अंतिम एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनच्या पोटाच्या स्नायूंना दुखापत (स्ट्रेन) झाली असून, त्यामुळे डर्बनमधील पहिल्या कसोटी सामन्यातील त्याच्या सहभागाबाबत शंका निर्माण झाली आहे.