प्रचंड दडपण आणि अनेक चुकांवर मात करत मर्सिडिझ संघाच्या निको रोसबर्गने जगज्जेतेपदाचा निकाल लावणाऱ्या अबू धाबी ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीसाठी अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने आपलाच सहकारी आणि विश्वविजेतेपदाचा दावेदार समजल्या जाणाऱ्या लुइस हॅमिल्टनवर सरशी साधली.
रोसबर्गने या मोसमातील ११व्या पोल पोझिशनवर नाव कोरले. मर्सिडिझ संघाची या मोसमातील ही १८वी विक्रमी पोल पोझिशन ठरली. ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीत हॅमिल्टन १७ गुणांनी आघाडीवर असला तरी या स्पर्धेत दुहेरी गुणांचा बोनस असल्यामुळे या दोघांपैकी जेतेपद पटकावणाराच विश्वविजेता होणार आहे. हॅमिल्टनला शनिवारी झालेल्या पात्रता फेरीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रोसबर्गने या आठवडय़ातील सर्वोत्तम फेरी (लॅप) नोंदवत अव्वल स्थान पटकावण्याची किमया साधली. त्याने १ मिनिट ४०.४८० सेकंद अशी वेळ दिली. विल्यम्सच्या वाल्टेरी बोट्टासने तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली. विल्यम्स संघाचा ब्राझीलचा ड्रायव्हर फेलिपे मासा चौथा आला. रेड बुलचे डॅनियल रिकार्डियो आणि सेबॅस्टियन वेटेल अनुक्रमे पाचवे आणि सहावे आले. टोरो रोस्सोचा डॅनियल क्वायट सातवा तर मॅकलॅरेनचा जेन्सन बटन आठवा आला.
फेरारीचे ड्रायव्हर किमी रायकोनेन आणि फर्नाडो अलोन्सो यांनी अनुक्रमे नववे आणि दहावे स्थान प्राप्त झाले.
पात्रता फेरीच्या दुसऱ्या प्रयत्नांत हॅमिल्टनने १ मिनिट ४०.९२० सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदवल्यानंतर तिसऱ्या लॅपमध्ये त्याने १ मिनिट ४०.८६६ अशी वेळ दिली. पण त्याला रोसबर्गला मागे टाकणे जमले नाही. ‘‘हॅमिल्टनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. दुसऱ्या प्रयत्नांत चांगली कामगिरी करूनही त्याला पोल पोझिशन मिळवता आली नाही,’’  असे मर्सिडिझ संघाचे प्रमुख टोटो वोल्फ यांनी सांगितले.
दरम्यान, सहारा फोर्स इंडियाच्या एकाही ड्रायव्हरला पात्रता फेरीत पहिल्या १० जणांमध्ये स्थान मिळवता आले नाही. सर्जिओ पेरेझ आणि निको हल्केनबर्ग यांना अनुक्रमे १३व्या आणि १४व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सर्जिओ पेरेझ फोर्स इंडियाकडेच
अबू धाबी : सहारा फोर्स इंडियाने मेक्सिकोचा ड्रायव्हर सर्जिओ पेरेझला २०१५ मोसमासाठी संघात कायम राखले आहे. ‘‘पेरेझ आणि हल्केनबर्गला पुढील मोसमासाठी करारबद्ध करताना आम्हाला आनंद होत आहे,’’ असे संघाचे सहमालक विजय मल्ल्या यांनी सांगितले. हल्केनबर्गशी गेल्या महिन्यातच करार करण्यात आला होता.