संघसहकारी ल्युइस हॅमिल्टनच्या हातून झालेल्या चुकीचा फायदा उठवत मर्सिडीझच्या निको रोसबर्गने ब्राझील ग्रां.प्रि. फॉम्र्युला वन शर्यतीच्या जेतेपदाची कमाई केली. या जेतेपदासह रोसबर्गने जागतिक अजिंक्यपदजिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मर्सिडीझ संघाच्याच ल्युइस हॅमिल्टनने दुसरे तर विल्यम्स संघाच्या फेलिपे मासाने तिसरे स्थान पटकावले.  
रोसबर्गच्या अव्वल स्थानामुळे भन्नाट फॉर्मात असलेल्या हॅमिल्टनची सलग पाचवी शर्यत जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. अव्वल स्थान हुकल्याने अजिंक्यपदासाठीच्या गुणतालिकेतील २४ गुणांची आघाडी घसरून १७वर आली आहे. आंतरराष्ट्रीय वेळापत्रकानुसार यंदाच्या वर्षांतील एकमेव आणि शेवटची शर्यत अबू धाबी येथे २३ नोव्हेंबरला होणार आहे.
शर्यतीत अव्वल आणि दुसरे स्थान पटकावण्याची मर्सिडीझ संघाची ही अकरावी वेळ आहे. मर्सिडीझने मॅकलरेन संघाचा विक्रम मोडला. रोसबर्गच्या अव्वल स्थानासह मर्सिडीझ संघाने यंदाच्या हंगामात तब्बल ३०व्यांदा अव्वल तीनमध्ये स्थान पटकावले आहे.
ब्राझील शर्यतीनंतर अजिंक्यपदाच्या शर्यतीत हॅमिल्टन ३३४ गुणांसह अव्वल तर रोसबर्ग ३१७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. अबू धाबी शर्यतीत दुसरे स्थान मिळाले तरी हॅमिल्टन विश्वविजेता होऊ शकतो.
२९ वर्षीय रोसबर्गने प्रत्येक सराव सत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले. यंदाच्या हंगामात १०व्यांदा पोल पोझिशन पटकावणाऱ्या रोसबर्गने अवघ्या १.४५७ सेकंदांच्या फरकाने हॅमिल्टनला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. संघाबरोबरच्या संभाषणात गोंधळ झाल्याने हॅमिल्टनचा थोडा वेळ हॅमर लॅपमध्ये वाया गेला. याचा फटका त्याला बसला. ‘ही छोटी चूक होती, मात्र त्यामुळे माझे जेतेपद हिरावले गेले’, असे हॅमिल्टनने सांगितले.
‘शर्यतीतील कामगिरीने मी समाधानी आहे. मी आक्रमण करू शकलो. मला संघाची तोलामोलाची साथ मिळाली’, असे रोसबर्गने सांगितले.

हल्केनबर्गला चार गुण, फोर्स इंडिया सहाव्या स्थानी
फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गला शर्यतीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यामुळे अजिंक्यपद गुणतालिकेत फोर्स इंडिया संघाला सहावे स्थान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्जिओ पेरेझला पेनल्टीमुळे गुण मिळवता आले नाहीत.