सरकारी हस्तक्षेपाचे कारण दाखवत ‘फिफा’ने नायजेरिया फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. विश्वचषक स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत नायजेरियाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर न्यायालयाने नायजेरिया फुटबॉल महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘सुपर ईगल्स’ या टोपणनावाने ओळखला जाणारा नायजेरियाचा संघ मायदेशी परतल्यावर सरकारने हस्तक्षेप करीत स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा नियुक्त केली होती.
‘‘सरकारी हस्तक्षेप होत असल्यामुळे नायजेरिया फुटबॉल महासंघाला त्वरित निलंबन करण्याचा निर्णय ‘फिफा’च्या आपत्कालीन समितीने घेतला आहे,’’ असे ‘फिफा’ने म्हटले आहे. ही कारवाई निराशाजनक आणि धक्कादायक आहे, असे पडसाद नायजेरियात उमटत आहेत.
कॅनडामध्ये ५ ते २४ ऑगस्ट या कालावधीत महिलांची वीस वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे. परंतु या निलंबनामुळे नायजेरियाला स्पध्रेत सहभागी होता येणार नाही. याचप्रमाणे नायजेरियाच्या संघाकडे सध्या १७ वर्षांखालील गटाचे विश्वविजेतेपद आहे. पण पुढील वर्षी होणाऱ्या आफ्रिकन ज्युनिअर अजिंक्यपद स्पध्रेला मुकावे लागणार आहे. या स्पध्रेसाठीचा पात्रता फेरीचा सामना २० जुलैला होणार आहे.
‘‘या कारवाईमुळे देशातील फुटबॉलची अपरिमित हानी होईल. ती टाळण्यासाठी निलंबन मागे घ्यावे,’’ अशी मागणी नायजेरियाचे माजी प्रशिक्षक ख्रिस्तियन च्युकवू यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2014 रोजी प्रकाशित
नायजेरिया फुटबॉल महासंघावर ‘फिफा’ची निलंबनाची कारवाई
सरकारी हस्तक्षेपाचे कारण दाखवत ‘फिफा’ने नायजेरिया फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे.
First published on: 11-07-2014 at 05:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigeria suspended from all international football matches