नायजेरियाची बोस्नियाशी लढत

बाद फेरीत प्रवेश करण्याच्या उद्देशाने नायजेरियाची बोस्निया आणि हेझ्रेगोविनाशी लढत होणार आहे. मायदेशात ब्राझील-मेक्सिको सामना पाहताना झालेल्या बाँबहल्ल्यात २१ नागरिकांना प्राण गमवावे लागले.

बाद फेरीत प्रवेश करण्याच्या उद्देशाने नायजेरियाची बोस्निया आणि हेझ्रेगोविनाशी लढत होणार आहे. मायदेशात ब्राझील-मेक्सिको सामना पाहताना झालेल्या बाँबहल्ल्यात २१ नागरिकांना प्राण गमवावे लागले. या दुर्दैवी घटनेच्या पाश्र्वभूमीवर नायजेरियाच्या संघाला ही लढत खेळायची आहे. बोस्नियाविरुद्ध विजय मिळवत हल्ल्यात जीव गमावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्याची नायजेरियाला संधी आहे.
‘फ’ गटात अर्जेटिनाचा संघ बलाढय़ मानला जात आहे. अन्य तीन संघांमध्ये बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. नायजेरियाने इराणविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली आहे. विश्वचषकातल्या नऊ लढतींमध्ये नायजेरियाला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. दुसरीकडे बोस्नियाला नायजेरियाविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य आहे.
‘‘अर्जेटिनाविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या लढतीत झालेल्या चुका टाळून चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असे बोस्नियाचे प्रशिक्षक साफेट सुसिक यांनी सांगितले. आक्रमणात इडीन झेकोच्या साथीने वेदाद इबिसेव्हिकला संधी देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  
‘‘इराणविरुद्ध आम्ही चांगला खेळ केला, मात्र गोल झळकावण्यात आम्हाला अपयश आले. बोस्नियाविरुद्ध ही चूक सुधारू,’’ असे नायजेरियाचे प्रशिक्षक स्टीफन केशी यांनी सांगितले.
सामना क्र. २८
‘फ’ गट : बोस्निया विरुद्ध नायजेरिया
स्थळ :  एरेना पँटॅनल, क्युइबा
 वेळ : (२२ जून) पहाटे ३.३० वा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nigeria vs bosnia herzegovina prediction preview

ताज्या बातम्या