अस्ताना (कझाकस्तान) : जागतिक विजेती निकहत झरीन (५२ किलो) आणि मीनाक्षी (४८ किलो) या भारताच्या महिला बॉक्सिंगपटूंनी एलोर्डा चषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना यंदा १२ पदके मिळवली. यात दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि आठ कांस्यपदकांचा समावेश होता. त्यामुळे भारताला गेल्या स्पर्धेतील पाच पदकांचा विक्रम मोडता आला.

निकहतने ५२ किलो वजनी गटातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना कझाकस्तानच्या झझीरा उरकाबायेवाला ५-० असे निष्प्रभ केले. त्यापूर्वी मीनाक्षीने भारताला दिवसाची यशस्वी सुरुवात करुन देताना ४८ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या रहमोनोवा सैदाहोनला ४-१ असे पराभूत केले आणि सुवर्णपदक मिळवले.

अनामिका (५० किलो) आणि मनीषा (६० किलो) यांना अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अनामिकाने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण तिला जागतिक आणि आशियाई विजेत्या चीनच्या वू यूकडून १-४ अशी हार पत्करावी लागली. मनीषाला कझाकस्तानच्या व्हिक्टोरिया ग्राफिवाने ०-५ असे पराभूत केले.

Story img Loader