माजी डेव्हिसपटू नितीन कीर्तनेने अनुभवाच्या जोरावर एकेरी व दुहेरीत विजेतेपद मिळवत पुणे खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान संपादन केला. महिलांमध्ये अंकिता रैनाने एकेरीत अजिंक्यपद मिळविले.
नितीनने एकेरीच्या अंतिम लढतीत जयेश पुंगलिया याचे आव्हान ८-२ असे परतविले. दुहेरीत त्याने केतन धुमाळ याच्या साथीत तेजस चौकुलकर व मुकुंद जोशी यांचा ६-४ असा पराभव केला.
महिलांमध्ये अंकिताने मुंबईच्या सोनल फडके हिच्यावर ६-०, ६-३ असा विजय मिळविला. दुहेरीत वासंती शिंदे व रश्मी तेलतुंबडे यांनी सिल्की सचदेव व सृष्टी दास यांना ६-४, ६-२ असे सहज नमवले.
मुलांच्या आठ वर्षांखालील गटात मुंबईच्या साहिल वारिकने अनन्मय उपाध्याय याच्यावर ४-१, ४-१ अशी मात केली. मुलींमध्ये पुण्याच्या इरा शहा हिने साक्षी बागवे हिला ४-१, ४-१ असे हरवीत अजिंक्यपद मिळविले.
१८ वर्षांखालील मुलांमध्ये जयेश पुंगलियाने इंद्र पटवर्धनवर ६-४ अशी मात केली. १२ वर्षांखालील मुलांमध्ये गिरीश चौगुलेने आदित्य श्रीरामवर ६-१, २-६, ६-१ अशी मात केली. मुलींमध्ये ऋचा चौगुलेने बेला ताम्हणकरला ६-१, ६-४ असे नमवले.