Delhi Premier League 2026 Nitish Rana Emotional Moment: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये १७ ऑगस्टला रात्री रोमांचक सामना पाहायला मिळाला. ज्यामध्ये साउथ दिल्ली सुपरस्टार्स संघाने वेस्ट दिल्ली लायन्सचा १० गडी राखून पराभव केला. पण या सामन्यापेक्षाही सर्वाधिक चर्चा नितीश राणाच्या कृतीची होत आहे. या सामन्यात नितीश राणा सामन्यादरम्यान मैदानावर रडताना दिसला. नितीश राणाने अर्धशतकी खेळीच सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर तो अचानक मैदानावर रडू लागला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
प्रथम फलंदाजी करताना, नितीश राणाने झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर वेस्ट दिल्लीच्या संघाने १६९ धावा केल्या. पण यादरम्यान मैदानात एक भावूक क्षण पाहायला मिळाला, नितीश राणाने आपलं अर्धशतक करताच तो वर आभाळाकडे बोट दाखवत आपलं सेलिब्रेशन करत होता. यानंतर तो खाली वाकला आणि त्याला अश्रू अनावर झाले. दिल्ली प्रीमियर लीगच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
नितीश राणाने आईला डेडिकेट केलं अर्धशतक
नितीश राणाला आपल्या आईची आठवण येताच भावूक होऊन रडू लागला; त्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आणि पंचांनी त्याला सावरण्याचा व धीर देण्याचा प्रयत्न केला. नितीशने या सामन्यातील अर्धशतक आपल्या आईला समर्पित केलं; दीर्घ आजारानंतर ऑगस्ट २०२६ मध्ये त्याच्या आईचं निधन झालं. नितीश राणाने हे दु:ख पचवत दिल्ली प्रीमियर लीग (DPL) मध्ये खेळण्यासाठी पोहोचला. आपल्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, जर्सीच्या मागील बाजूस तिचं नाव ‘N. SATISH’ असं लिहून तो मैदानात उतरला होता.
१७० धावांचं लक्ष्य गाठताना, सनत सांगवानचे शानदार शतक आणि अनमोल शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर साउथ दिल्ली सुपरस्टार्ट्सने एकही बळी न गमावता १५.२ षटकांत हे लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्यात सनत सांगवानने ५४ चेंडूंत १० षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १११ धावांची नाबाद खेळी केली. त्याच वेळी, अनमोल शर्माने ३८ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावा केल्या.
वेस्ट दिल्ली लायन्सची सुरुवात फारशी प्रभावी झाली नाही. कृष यादव २६ चेंडूंत २५ धावा करून बाद झाला, तर अंकित कुमारने ११ धावा केल्या. त्यानंतर नितीश राणाने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत अवघ्या ३३ चेंडूंत ६० धावा कुटल्या; त्याच्या या खेळीत सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. यानंतर आयुषने २० चेंडूत २७ धावांंचं योगदान दिलं. यानंतर खालच्या फळीती सहा फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. परिणामी संपूर्ण संघ १९.५ षटकांत १६९ धावांवर सर्वबाद झाला.
