‘स्पर्धा, शर्यत हे बाह्य जगासाठी आहे. आम्ही देशासाठी खेळतो. संघाला जिंकून देणे हे मी काय किंवा वैभव यांचे आद्य कर्तव्य आहे. कोण जिंकून देतोय हे तितकंसं महत्त्वाचं नाही. मला संधी मिळाली नाही, अमुकलै मिळाली असा नकारात्मक विचार करत नाही’, असं मत यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने व्यक्त केलं.
संजूऐवजी वैभवला संधी मिळावी असं मत काही माजी खेळाडूंनी व्यक्त केलं होतं. ‘मी वायफाय बंद करतो, जेणेकरून मला काही दिसतच नाही. पण काही वेळेस वायफाय सुरू होतं आणि लोक काय म्हणत आहेत ते दिसतं, ऐकायला येतं. मैदानाबाहेर काय बोललं जातं याचा परिणाम खेळाडूंच्या मनावर होतो. पण संघाला जिंकून देण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष द्यायला हवं, त्याकडे लक्ष हवं’, असं संजू म्हणाला.
संजू म्हणाला, ‘आधी मला या सगळ्याचा खूप त्रास व्हायचा, आता मी परिपक्व झालो आहे. मी रोबो नाहीये, मलाही भावभावना आहेत. लोक काहीही बोलतात, तुम्हाला त्रास होतो. मी जर लोक काय म्हणतात याकडे लक्ष दिलं तर खेळाकडे दुर्लक्ष होईल. आता खेळतोय तसा खेळू शकणार नाही’.
अफगाणिस्तानविरुध्दची मालिका भारताने जिंकली आहे. त्यामुळे डेड रबर झालेल्या तिसऱ्या लढतीत संजू किंवा अभिषेकऐवजी वैभवला संधी मिळू शकते असे संकेत कर्णधार श्रेयस अय्यरने दिले.
कारकिर्दीत सातत्याने आतबाहेर झालेल्या संजूला यंदाच्या वर्ल्डकपमधल्या सुरूवातीच्या सामन्यांमधून वगळण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संजूचा समावेश करण्यात आला. सलग तीन सामन्यात अर्धशतकांसह संजूने भारताच्या टी२० वर्ल्डकप विजयात सिंहाचा वाटा उचलला. संजूला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
तडाखेबंद फलंदाजी आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही आघाड्या संजूने समर्थपणे सांभाळल्या होत्या. आयपीएलमध्ये १५वर्षीय वैभवने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपचा मान पटकावला. आयर्लंड इंग्लंड दौऱ्यासाठी वैभवची भारतीय संघात निवड झाली. इंग्लंडविरुद्ध संजूला वगळून वैभवची अंतिम अकरात निवड करण्यात आली. सलामीवीराच्या जागेसाठी संजू, वैभव आणि अभिषेक शर्मा यांच्यात कडवी टक्कर आहे. या तिघांमधील स्पर्धेमुळे यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल यांची टी२० संघात निवड होऊ शकलेली नाही.
