Arjun Tendulkar Interview: आयपीएल २०२६ स्पर्धेतील पाचवा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिले गेले नव्हते. अर्जुन गेल्या हंगामपर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. या हंगामात तो लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. दरम्यान पहिल्या सामन्याआधी दिलेल्या मुलाखतीत त्याने भारतीय संघासाठी खेळण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
अर्जुन तेंडुलकरने शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खेळाबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. “येत्या ५ वर्षांत तुला स्वतःला कोणत्या रूपात पाहायला आवडेल? भारतासाठी खेळणारा खेळाडू म्हणून, आयपीएल स्पर्धेतील स्टार खेळाडू म्हणून की असा एक खेळाडू जो खेळाला पूर्ण प्रामाणिकपणे सर्वस्व अर्पण करतो आणि त्यातच आपले समाधान मानतो.”
असा प्रश्न विचारला असताना अर्जुन म्हणाला, “शेवटचा पर्याय.. सर्वात महत्वाचं म्हणजे मनापासून आनंदी राहणं, कोणालाही त्रास किंवा इजा न पोहोचवणं आणि प्रामाणिकपणे आपलं आयुष्य जगणं.”
अर्जुन तेंडुलकर हा गेल्या ५ वर्षांपासून आयपीएल स्पर्धेचा भाग आहे. २०२१ मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला पहिल्यांदा आपल्या संघात स्थान दिलं होतं. गेल्या हंगामापर्यंत तो या संघाचा भाग होता. पण आयपीएल २०२६ च्या लिलावात मुंबईने त्याला लखनौसोबत ट्रेड केलं. तर शार्दुल ठाकूरला आपल्या संघात घेतलं. गेल्या ५ वर्षांत त्याला मुंबईकडून हवे तितके सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता लखनौकडून खेळताना त्याला चांगली कामगिरी करायची आहे.
गोलंदाजीत चांगली कामगिरी करूनही त्याला पुरेशी संधी मिळाली नव्हती. आणखी सामने खेळायची संधी मिळायला हवी होती का? या प्रश्नाचं उत्तर देताना अर्जुन म्हणाला, “असं कोणाला नको आहे? कोणत्याही खेळाडूला बेंचवर बसून राहायला आवडत नाही. पण मेहनत करणे हे आपले काम आहे आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा संधीचं सोनं करणं हे महत्वाचं आहे.” आयपीएल २०२६ स्पर्धेतील मिनी ऑक्शनआधी लखनौ सुपर जायंट्स संघातील शार्दुल ठाकूरने मुंबई इंडियन्स संघात प्रवेश केला. तर मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने लखनौ सुपर जायंट्स संघात प्रवेश केला. अर्जुनने आयपीएल स्पर्धेत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये ३ गडी बाद केले आहेत.
