विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ओव्हपर्यंत रंगलेल्या अंतिम फेरीचा सामना ‘टाय’ अवस्थेत सुटला. त्यामुळे कोणीही अंतिम सामना गमावलेला नाही, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने मंगळवारी व्यक्त केली.

सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर मंगळवारी सकाळी न्यूझीलंड संघातील काही खेळाडू मायदेशी परतले. अंतिम सामन्यातील सर्वाधिक सीमापार फटके मारणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निर्णयावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी ताशेरे ओढले. परंतु विल्यम्सनने याविषयी तक्रार न करता संघातील खेळाडूंचे कौतुक केले.

‘‘दिवसाच्या अखेरीस एकही गोष्ट दोन्ही संघांमध्ये काय फरक होता, हे स्पष्ट करू शकली नाही. त्यामुळे अंतिम फेरीत कोणीही पराभूत झालेले नाही. मात्र नियामांनुसार एकाला विजेतेपद मिळणे स्वाभाविक होते आणि त्यानुसार तुमच्यापुढे विजेता संघ आहे,’’ असे विल्यम्सन म्हणाला.

‘‘स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी चौकारांच्या नियमाने विजेता ठरेल, असा कधी विचारही केला नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली. मला त्यांचा अभिमान वाटतो. विजेता ठरवण्यासाठी दोन पर्यायांचा अवलंब करण्यात आला आणि आम्ही त्यामध्ये कमनशिबी ठरलो, इतकेच मी सांगू शकतो,’’ असे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या विल्यम्सनने सांगितले.

खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारणाऱ्या विल्यम्सनवर कौतुकाचा वर्षांव

लंडन : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपूर्ण १०० षटके आणि सुपर ओव्हरमध्येही बरोबरी साधल्यानंतर फक्त सर्वाधिक सीमापार फटक्यांच्या नियमांमुळे विश्वविजेतेपद गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाला जगभरातून चाहत्यांची सहानुभूती लाभत आहे. त्यातही कर्णधार विल्यम्सनचे पराभवानंतरचे स्मितहास्य आणि त्याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरले आहे. सोमवार-मंगळवार अशा दोन्ही दिवशी विल्यम्सनवर विश्वभरातील चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षांव करण्यात आला.

*  वरिष्ठ क्रीडा समालोचक हर्षां भोगले यांनी विल्यम्सनची स्तुती करताना ‘‘तू खरा हिरो आहेस, आज तुझ्या लाखो चाहत्यांच्या आकडय़ात माझाही समावेश झाला,’’ असे गौरवोद्गार काढले. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर यांनीसुद्धा अशाच आशयाचे ट्वीट केले.

* केन विल्यम्सनसारख्या माणसांची संपूर्ण जगाला गरज आहे. मात्र तूर्तास त्याला न्यूझीलंडचा पंतप्रधान नक्कीच बनवता येईल!

*  विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत होऊनही तू कसा हसू शकतोस. विल्यम्सन तू अविश्वसनीय आहेस!

*  काहींनी विकिपीडियावर विश्वचषक २०१९चा अंतिम सामना इंग्लंड कशा प्रकारे जिंकला हे दर्शवले.

*  ‘आयसीसी’नेसुद्धा विल्यम्सनचे कौतुक करताना पराभवातही विल्यम्सन अत्यंत कृपाळू आणि बर्फासारखा शांत राहू शकतो, असे छायाचित्र ‘ट्विटर’वर पोस्ट केले. त्याशिवाय विल्यम्सनलाच विश्वचषकातील सर्वोत्तम संघाच्या नेतृत्वाची भूमिका सोपवली.