काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली काही वरिष्ठ खेळाडूंच्या नजरेत आल्याचे म्हटले जात होते. त्यांनी विराटची बीसीसीआयकडे तक्रार केल्याच्याही चर्चा समोर आल्या होत्या. मात्र आता बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी या गोष्टीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विराटबाबतच्या सर्व अफवा फेटाळत मीडियावर ताशेरे ओढले आहेत.

वरिष्ठ खेळाडूंनी विराट कोहलीबद्दल बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केली होती, अशा चर्चाना उधाण आले होते. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी कोहलीच्या तक्रारीबाबतचे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.

विराटने १६ सप्टेंबर रोजी भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर, विराट निवड समितीकडे गेला होता आणि त्यांना रोहितला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यास सांगितले होते, असे काही रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी भारताचे दोन ज्येष्ठ क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पराभवानंतर कोहलीबद्दल शहाकडे तक्रार केली होती, असेही सांगण्यात आले होते.

हेही वाचा – T20 World Cup : ‘‘ही ट्रॉफी आमचीच…”, प्रेरणादायी पोस्ट शेअर करत रोहितनं जिंकली मनं!

या अहवालांवर, धुमाळ यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, “माध्यमांनी हे निराधार लिहिणे थांबवावे. कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने बीसीसीआयकडे लेखी किंवा तोंडी तक्रार केलेली नाही. बीसीसीआय प्रत्येक खोट्या अहवालाला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही काही अहवाल पाहिले ज्यात असे म्हटले होते, की भारताच्या विश्वचषक संघात बदल होतील. हे कोण म्हणाले?”

विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत धुमाळ म्हणाले, “विराटच्या कर्णधारपद सोडण्याबाबत बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतला नाही किंवा चर्चाही केली नाही. विराटने स्वतःचा निर्णय घेतला आणि तो बीसीसीआयला सांगितला आणि हा त्याचा कॉल होता.”