रोहित-विराटच्या कामगिरीची चिंता नाही!; भारताच्या आजी-माजी कर्णधाराला सूर गवसण्याचा गांगुलीला विश्वास

रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय क्रिकेट संघाच्या आजी-माजी कर्णधारांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या यंदाच्या हंगामात धावांसाठी झगडावे लागले.

पीटीआय, कोलकाता : रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय क्रिकेट संघाच्या आजी-माजी कर्णधारांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या यंदाच्या हंगामात धावांसाठी झगडावे लागले. मात्र, या दोघांच्या कामगिरीची चिंता नसून त्यांना लवकरच सूर गवसेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केला.

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहितला यंदा ‘आयपीएल’मध्ये १४ सामन्यांत केवळ २६८ धावा करता आल्या. तसेच त्याचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. ‘‘कर्णधार म्हणून रोहितने यापूर्वी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखालील संघांनी पाच वेळा ‘आयपीएल’, तर एकदा आशिया चषकाचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे त्याच्या क्षमतेबाबत कोणालाही शंका नाही. खेळाडूही माणसेच आहेत आणि माणसाकडून कधी तरी चुका होणार हे अपेक्षितच असते,’’ असे गांगुली म्हणाला.

तसेच गुजरात टायटन्सविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यातील अर्धशतकापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विराटला १३ सामन्यांत केवळ २३६ धावा करता आल्या होत्या. त्याला तीन वेळा पहिल्याच चेंडूवर खातेही न उघडता माघारी परतावे लागले होते. परंतु विराट आणि रोहित या दोन्ही अनुभवी खेळाडूंना गांगुलीने पाठिंबा दर्शवला आहे. ‘‘ते दोघेही गुणवान खेळाडू आहेत. त्यांना लवकरच सूर गवसेल आणि ते मोठय़ा धावा करतील याची मला खात्री आहे. आता सर्वच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खूप सामने खेळावे लागतात. त्यामुळे त्यांची कामगिरी कधी तरी खालावू शकते. विराट आणि रोहित हे उत्कृष्ट खेळाडू असून त्यांना फार काळ सर्वोत्तम खेळ करण्यापासून रोखणे अवघड आहे,’’ असेही गांगुलीने नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No worries rohit virat performance ganguly believes india former captain ysh

Next Story
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची विजयी सलामी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी