Pakistan Spinner Noman Ali Record: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये यादरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिला कसोटी सामना ढाकामध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात एका पाकिस्तानी गोलंदाजाने मोठा विश्वविक्रम प्रस्थापित केला. पाकिस्तानचा वरिष्ठ गोलंदाज नोमान अलीने १३० वर्षे जुना विक्रम मोडत स्वत:च्या नावे या विक्रमाची नोंद केली आहे.
पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू नोमान अलीने बांगलादेशविरूद्ध सुरू असलेल्या कसोटीत मेहदी हसन मिराजला बाद करत मोठा विक्रम केला. नोमान अलीने कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट्सचा पल्ला गाठला आहे. नोमान अलीने २०२१ मध्ये कसोटी पदार्पण केलं, तेव्हा त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. तेव्हापासून तो पाकिस्तान संघाचा महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. त्याने आता १०० कसोटी बळी पूर्ण केले आहेत. मात्र, ज्या वयात त्याने हा पराक्रम केला आहे, त्यानुसार त्याने हा विश्वविक्रम केला आहे.
नोमान अलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
नोमान अलीने वयाच्या ३९ वर्षे आणि २१९ दिवसांत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १०० बळी घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. यासह त्याने इंग्लंडच्या बॉबी पीलचा १८९६ सालापासून कायम असलेला विक्रम मोडला. बॉबी पीलने ३९ वर्षे आणि १८० दिवसांच्या वयात १०० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या होत्या. त्यांनी ३९ वर्षे आणि १८० दिवस वय असताना हा पराक्रम केला होता. बहुतेकांनी तर बॉबी पील यांचं नावदेखील ऐकलं नसेल. पील १८८४ ते १८९६ या काळात इंग्लंडकडून क्रिकेट खेळले.
कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करणारे सर्वात वयस्कर खेळाडू
नोमान अली (पाकिस्तान) – ३९ वर्षे २१७ दिवस
बॉबी पील (इंग्लंड) – ३९ वर्षे १८० दिवस
रे इलिंगवर्थ (इंग्लंड) – ३९ वर्षे ३० दिवस
क्लॅरी ग्रिमेट (ऑस्ट्रेलिया) – ३९ वर्षे २२ दिवस
सिडनी बार्न्स (इंग्लंड) – ३८ वर्षे ३१० दिवस
नोमान अलीचा कसोटी क्रिकेटमधील प्रवास हा पाकिस्तान क्रिकेटमधील उशिरा मिळालेल्या यशाच्या सर्वात प्रेरणादायी कहाण्यांपैकी एक मानला जातो. सिंध प्रांतातील संघर येथे जन्मलेल्या नोमानने २०२१ मध्ये कराची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३४ व्या वर्षी कसोटी पदार्पण केलं होतं. नोमान अलीने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवातही संस्मरणीय केली होती. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात दोन विकेट्स घेतल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.
कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा तो पाकिस्तानचा १२वा गोलंदाज ठरला. त्यानंतर नोमानने पाकिस्तानकडून आतापर्यंत २२ कसोटी सामने खेळले असून, २५.०८ च्या सरासरीने १०१ विकेट्स घेतल्या आहेत. अनुभवी फिरकीपटूने कसोटीत नऊ वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे, तर तीन वेळा एका सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे. यासोबतच तो कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करणारा पाकिस्तानचा २१वा गोलंदाज ठरला.
