Harmanpreet Kaur Press Conference Video Viral : महिला आशिया चषक स्पर्धेत शुक्रवारी (१९ जुलै) भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त टीम इंडिया यूएई आणि नेपाळसह अ गटात आहे. श्रीलंकेत होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. आशिया कप सुरू होण्यापूर्वी सर्व कर्णधार पत्रकार परिषदेत एकत्र दिसले. यावेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एका पत्रकाराने हरमनप्रीतला महिला क्रिकेटला पाठिंबा नसल्याबद्दल विचारले. प्रथम भारतीय कर्णधाराला प्रश्न समजून घेण्यात काही अडचण आली, नंतर तिला याबद्दल आश्चर्य वाटले. या प्रश्नावर श्रीलंकेच्या महिला संघाची कर्णधार चमरी अटापट्टूलाही हसू आवरता आले नाही. गेल्या बांगलादेश दौऱ्याचे उदाहरण देत पत्रकाराने महिला क्रिकेटच्या खराब मीडिया कव्हरेजबद्दल काही करण्याची गरज आहे का असे विचारले.

हरमनप्रीत आश्चर्यचकित तर अटापट्टू हसली –

पत्रकाराने विचारले, “महिला क्रिकेटच्या महत्त्वाबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे, विशेषत: बांगलादेश दौऱ्यानंतर. तुमच्या पत्रकार परिषदेला पत्रकार कमी आले. यावर तुमचे काय मत आहे?” हरमनप्रीतने उत्तर दिले, “ठीक आहे, हे माझे काम नाही. तुम्हाला येऊन आम्हाला कव्हर करावे लागेल.” हरमनप्रीतची टीम इंडिया शुक्रवारी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप २०२४ च्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय कर्णधार विजयाने मोहिमेची सुरुवात करण्यास उत्सुक आहे.

हेही वाचा – INDW vs PAKW Live Score : सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने, कोण मारणार बाजी?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल भारतीय कर्णधार काय म्हणाली?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत हरमनप्रीत म्हणाली, “पाकिस्तानविरुद्ध खेळताना आम्हाला नेहमीच आनंद मिळतो, पण प्रत्येक संघ महत्त्वाचा असतो. आम्ही जेव्हा जेव्हा मैदानावर जातो आणि खेळतो तेव्हा आम्हाला नेहमीच चांगले क्रिकेट खेळायचे असते आणि आम्ही त्याच शैलीचे अनुसरण करू. ही स्पर्धा आम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आम्ही या स्पर्धेला समान आदर देतो. आम्ही टी-२० विश्वचषक किंवा इतर कोणत्याही विश्वचषकाची तयारी करतो त्याप्रमाणेच या स्पर्धेत कामगिरी करण्यावर आमचे लक्ष राहील. प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.”