वेस्ट इंडिजचा महान माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याच्या नावाने त्रिनिदादमध्ये उभारण्यात आलेल्या ‘दी ब्रायन लारा’ या स्टेडियमचे लवकरच उदघाटन होणार आहे. लारा इलेव्हन आणि सचिन इलेव्हन या सामन्याने स्टेडियमचे उदघाटन करण्यात येईल. या नव्या स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरच्या नावाचा स्टॅण्ड असणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

लारा आणि तेंडुलकर हे एकाच दशकात खेळलेले महान फलंदाज आहेत. वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधीत्व करत असले तरी दोघांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. नव्वदीच्या दशकात दोघांची तुलना देखील केली गेली. पण एकमेकांकडे या दोघांनी केव्हाच स्पर्धक म्हणून पाहिले नाही. संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठीची धडपड आणि त्यातून झालेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर सचिन, लाराने नव्वदीचे दशक गाजवले.
”ब्रायन लाराच्या सल्ल्यानुसार स्टेडियममधील एका स्टॅण्डला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. स्टेडियम आणि अकादमी संबंधांतील नियमांच्या निर्णय प्रक्रियेत आम्ही लाराचा समावेश केला आहे, असे टी अँड टी स्पोर्ट्सचे चेअरमन मायकल फिलिप्स यांनी सांगितले.

 

ब्रायन लाराने कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम रचून क्रिकेटला अलविदा केला होता. पुढे २००८ साली सचिनने लाराचा विक्रम मोडीत काढला. सचिन तेंडुलकरने २०१३ साली कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली त्यावेळी सचिनच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये १५,९२१ धावा जमा होत्या. ब्रायन लाराच्या नावावरचा कसोटी क्रिकेटमधील ४०० धावांच्या वैयक्तिक खेळीचा विक्रम अद्याप कोणी मोडीस काढू शकलेलं नाही. २००४ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत लाराने नाबाद ४०० धावांची खेळी साकारली होती. याशिवाय फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये नाबाद ५०१ धावांच्या खेळीचाही विक्रम लाराच्या नावावर आहे.