इंडियन सुपर लीग : नाटय़मय लढतीत युनायटेडचा चेन्नईयनवर विजय

मंगळवारच्या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडने चेन्नईयन एफसी क्लबवर नाटय़मयरीत्या २-० असा विजय मिळवला.

अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणून धरलेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पध्रेतील मंगळवारच्या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडने चेन्नईयन एफसी क्लबवर नाटय़मयरीत्या २-० असा विजय मिळवला. ९०व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर सिमाओ साब्रोसाने अचूक गोल करून युनायटेडला मिळवून दिली. पुढच्याच क्षणाला निकोलस व्हेलेजने गोल करत युनायटेडला आयएसएलच्या दुसऱ्या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. पराभवामुळे आक्रमक झालेल्या चेन्नईयनच्या खेळाडूंची युनायटेडच्या काही खेळाडूंसोबत बाचाबाची झाली.
तीन सामन्यात पराभव पत्करणाऱ्या युनायटेडने घरच्या मैदानावरील या सामन्यात सुरुवातीपासून आक्रमण केले. सामन्याच्या ४०व्या मिनिटाला खाब्राला लाल कार्ड दाखवल्याने चेन्नईयनला दहा खेळाडूंसह उर्वरित सामन्यात संघर्ष करावा लागला. पण त्यानंतरही प्रत्येक गोलसाठी यजमानांना झगडावे लागले. निर्धारित वेळेत हा सामना गोलशून्य बरोबरीत राहणार अशी चिन्हे दिसू लागली होती. मात्र, अतिरिक्त वेळेत मिळालेल्या पेनल्टीचा फायदा उचलताना सिमाओने युनायटेडसाठी पहिला गोल केला. अवघ्या काही मिनिटांतच व्हेलेजने गोल करून युनायटेडचा विजय पक्का केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Northeast united beat chennaiyin fc in an extremely close match win