घरच्या मैदानावर सूर न सापडलेल्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनवर एकतर्फी विजय मिळवत भारताच्या विश्वनाथन आनंदने नॉर्वे चषक बुद्धिबळ स्पर्धेत सनसनाटी कामगिरीची नोंद केली. या विजयासह आनंदने चौथ्या फेरीअखेर अडीच गुणांसह संयुक्त तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
या स्पर्धेतील पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये आनंदला बरोबरीस सामोरे जावे लागले होते. विजयासाठी आसुसलेल्या आनंदने कार्लसनविरुद्ध सर्वोच्च कौशल्य दाखवीत निर्भेळ विजय मिळवला. आनंदला कार्लसनविरुद्ध लागोपाठ दोन वेळा विश्वविजेतेपदाची लढत गमवावी लागली होती.
बल्गेरियाच्या व्हॅसेलीन तोपालोव्हने साडेतीन गुणांसह आघाडी मिळवली आहे. त्याने अर्मेनियाच्या लिव्हॉन आरोनियनवर ५८ चालींमध्ये शानदार विजय मिळविला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने तीन गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. त्याने नेदरलँड्सच्या अनिष गिरीविरुद्ध बरोबरी स्वीकारली. गिरीचे अडीच गुण झाले आहेत. अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक (२) या रशियन खेळाडूने नॉर्वेच्या जॉन लुडविग हॅमरवर (१) सहज मात केली. इटलीचा अव्वल दर्जाचा खेळाडू फॅबिआनो कारुआनाला फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॅचिअर लाग्रेव्हविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले. त्यांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. कार्लसन हा अद्यापि अध्र्या गुणासह शेवटच्या स्थानावर आहे.
आनंदने रॉय लोपेझ तंत्राचे ब्रेयर बचावामध्ये रूपांतर केले. पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळण्याचा फायदा घेत त्याने डावाच्या मध्यास खेळावर नियंत्रण मिळवले. कार्लसनने धोका पत्करून डावपेच करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा अनिष्ट परिणाम त्याच्यावर झाला. आनंदने कार्लसनच्या राजाच्या बाजूवर जोरदार आक्रमण केले. त्याने वजिराच्या साहाय्याने कार्लसनचा बचाव खिळखिळा केला. कार्लसनने डाव बरोबरीत ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, मात्र आनंदने अव्वल दर्जाचा खेळ करीत ४७ चालींमध्ये कार्लसनचा सपशेल पाडाव केला.
कार्लसनविरुद्ध विजय मिळविण्याच्या निर्धारानेच मी योजना केली होती. डावाच्या सुरुवातीच्या चाली करण्यास थोडासा वेळ लागला, मात्र नंतर मी झटपट चाली करीत हा वेळ भरून काढला. कार्लसननेही काही चांगल्या चाली केल्या. मात्र माझा खेळ नियोजनबद्ध झाला, त्यामुळेच त्याला फारशी संधी मिळाली नाही.
– विश्वनाथन आनंद