वृत्तसंस्था, स्टावन्गर
जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशने सलग दुसऱ्यांदा पटावर नाजूक स्थितीत असताना बाजी पलटविण्यात यश मिळवले. गुकेशने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील आपला झंझावात कायम राखताना मॅग्नस कार्लसनपाठोपाठ भारतीय सहकारी अर्जुन एरिगेसीला पारंपरिक प्रकारात प्रथमच पराभूत करण्याची कामगिरी केली. या विजयानंतर तो गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
अव्वल दर्जाच्या सहा बुद्धिबळपटूंमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुकेशने सहाव्या फेरीत कार्लसनवर मात केली होती. चार तास चाललेल्या या लढतीत कार्लसन बराच वेळ भक्कम स्थितीत होता. परंतु गुकेशने शेवटपर्यंत झुंज देत लढत जिंकण्यात यश मिळवले होते. त्यानंतर सातव्या फेरीत गुकेशसमोर पुन्हा एरिगेसीसारख्या अलौकिक प्रतिभेच्या बुद्धिबळपटूचे आव्हान होते.
गेल्या काही काळात या दोघांनी भारताचे सर्वोत्तम दोन बुद्धिबळ म्हणून ख्याती मिळवली आहे. गुकेश जगज्जेता असला, तरी पारंपरिक प्रकारात त्याला याआधी सहा प्रयत्नांत एरिगेसीचे आव्हान परतवणे जमले नव्हते. नॉर्वे स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत एरिगेसीने गुकेशवर मात केली होती. सातव्या फेरीत याच निकालाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे होती. काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या एरिगेसीने भक्कम स्थिती मिळवली होती. त्याने हत्तीच्या मोहऱ्याचा वापर करून गुकेशला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुकेशने पुन्हा एकदा दडपणाखाली संयम आणि बचावाचे उत्कृष्ट कौशल्य दाखवून देताना प्रतिस्पर्ध्याला निर्णायक चाल रचण्यापासून रोखले. ६०व्या चालीनंतर दोन्ही बुद्धिबळपटूंमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. अखेरीस तब्बल ९२ चालींच्या झुंजीनंतर गुकेशने विजयाची नोंद केली.
दुसऱ्या स्थानी झेप
पाचव्या फेरीअखेरीस गुकेश गुणतालिकेत अखेरच्या स्थानी होता. मात्र, सलग दोन लढतींत विजय मिळवल्याने गुकेशने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अग्रस्थानावरील अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचे १२.५ गुण, तर गुकेशचे ११.५ गुण आहेत. पाच वेळचा जगज्जेता कार्लसन ११ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. याखालोखाल हिकारू नाकामुरा (८.५ गुण), एरिगेसी (७.५) आणि वे यी (६.५) यांचा क्रमांक लागतो. सातव्या फेरीत कार्लसनने ‘आर्मागेडॉन’ टायब्रेकरमध्ये नाकामुरावर, तर कारुआनाने वे यी याच्यावर मात केली.
हम्पी पुन्हा पराभूत
महिला विभागात भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला सलग दुसऱ्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या फेरीत आर. वैशालीकडून हार पत्करणाऱ्या हम्पीला सातव्या फेरीत युक्रेनच्या ॲना मुझिचुकने पराभूत केले. त्यामुळे हम्पीची आता आघाडीवरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. हम्पीचे १०.५ गुण आहेत. पाच वेळची जगज्जेती चीनची जू वेन्जून ११.५ गुणांसह अव्वल, तर मुझिचुक ११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
मी पराभवाच्या छायेत होतो असे म्हणायला हरकत नाही. अर्जुन माझ्यापेक्षा चांगला खेळत होता. मात्र, मी आशा सोडली नाही. मला पुनरागमनाची संधी दिसली. त्यानंतर मी चालींमध्ये अचुकता राखण्याचा प्रयत्न केला. दोन्ही खेळाडूंकडे चाली रचण्यासाठी कमी वेळ असल्यास चुका घडण्याची शक्यता असते. त्यामुळे लढत कोणत्याही दिशेला जाऊ शकते. यावेळी निकाल माझ्या बाजूने लागला याचे समाधान आहे. – गुकेश