ओस्लो : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने दोन वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करताना नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणार्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का देत तीन गुणांची कमाई केली. जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशने मात्र पुन्हा निराशा केली. फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाने त्याला ‘आर्मागेडॉन’ (टायब्रेक) डावात पराभूत केले. गुकेशचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
सध्या कार्लसन फारसे पारंपरिक (क्लासिकल) बुद्धिबळ खेळत नाही. ‘नॉर्वे चेस’ ही त्याच्या मोजक्या पारंपरिक स्पर्धांपैकी एक. त्यामुळे विश्वातील अव्वल बुद्धिबळपटूवर मिळवलेला विजय विशेष मानला जातो. प्रज्ञानंद मात्र फारसा समाधानी नव्हता. ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे तर मला हा विजय फार मोठा वाटत नाही. आम्हाला दोघांना समान संधी होती. शेवटी मला नशिबाची साथ लाभली आणि त्यामुळेच मी जिंकलो,’’ असे प्रज्ञानंदने सामना संपल्यानंतर भारतीय माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रज्ञानंदला हा विजय मोठा वाटत नसला, तरी या निकालाचा त्याला निश्चितपणे फायदा झाला. त्याने ४.५ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. फिरुझा ७.५ गुणांसह अग्रस्थानी आहे. गुकेशचे ३.५ गुण असून तो सहा खेळाडूंच्या खुल्या विभागात चौथ्या स्थानी आहे. कार्लसन १.५ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. प्रज्ञानंदने २०२४ मध्ये याच स्पर्धेच्या पारंपरिक प्रारूपात प्रथम कार्लसनला पराभूत केले होते.
यंदाही प्रज्ञानंद आणि कार्लसन यांच्यात चुरस पाहायला मिळाली. दोघांनी सुरुवात आक्रमक केली. मधल्या टप्प्यात सामना अधिकच रंगत गेला. वेळेच्या ताणामुळे दोन्ही खेळाडूंकडून चुका होऊ लागल्या. नॉर्वे स्पर्धेतील विशेष वेळ नियंत्रणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक खेळाडूला सुरुवातीला १२० मिनिटे देण्यात आली होती, तर ४१व्या चालीपासूनच प्रत्येक चालीला १० सेकंदांची वाढ मिळणार होती. ३७व्या चालीनंतर प्रज्ञानंद अडचणीत सापडण्याची चिन्हे होती. मात्र, दोघांच्याही घड्याळावर काही सेकंद उरले असताना चुका वाढत गेल्या. यात कार्लसनला वेळेचे गणित साधणे अवघड गेले. अखेरीस त्याने ४६व्या चालीवर हार मान्य केली.
दरम्यान फिरुझाने सलग तिसरा विजय मिळवताना जगज्जेत्या गुकेशवरही मात केली. गुकेशला कामगिरी उंचावण्यात वारंवार अपयश येत आहे. पुढच्या फेरीत गुकेशसमोर कार्लसनचे आव्हान असणार आहे. गतवर्षी गुकेशने कार्लसनला मात दिली होती. आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास तो उत्सुक असेल.
दिव्याची लय कायम
महिला विभागात विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखने तिसर्यांदा ‘आर्मागेडॉन’ डावात विजय नोंदवला. पहिल्या दोन फेर्यांत अनुक्रमे जगज्जेती जू वेन्जून आणि कोनेरू हम्पी यांना पराभूत करणार्या दिव्याने या वेळी बिबिसारा असाउबायेवा हिला नमवले. दिव्या ४.५ गुणांसह दुसर्या स्थानी आहे, तर बिबिसारा ५.५ गुणांसह अग्रस्थानी आहे. हम्पीला गतविजेत्या ॲना मुझिचुककडून पराभव पत्करावा लागला. हम्पी सध्या दोन गुणांसह सहाव्या स्थानी आहे.
