ओस्लो : आपला २०वा वाढदिवस साजरा केल्याच्या एका दिवसानंतरच जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशने बुद्धिबळाच्या पटावर चमकदार कामगिरी करताना नॉर्वे स्पर्धेच्या पाचव्या फेरीत भारतीय सहकारी आर. प्रज्ञानंदवर ‘पारंपरिक’ डावातच मात केली. त्यामुळे तीन गुणांची कमाई करत गुकेशने गुणतालिकेत वरच्या स्थानच्या दिशेने कूच केले. त्याच वेळी भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने चीनच्या झू जिनेरला मात देत महिला विभागात आघाडी मिळवली आहे.

गुकेश आणि प्रज्ञानंद यांच्यातील सामना चुरशीचा झाला. काही मिनिटांतच सामन्याचे पारडे अनेकदा फिरले. गुकेश पराभवाच्या उंबरठ्यावर होता, पण त्याने बचाव भक्कम राखत आणि सकारात्मकता दाखवत प्रज्ञानंदला हार पत्करण्यास भाग पाडले. ‘‘काही महिन्यांपूर्वीपेक्षा मी आता खूप चांगल्या स्थितीत आहे. मी अधिक सतर्क आणि आनंदी आहे. निकालांमध्ये सुधारणा होत आहे, पण स्वत:च्या खेळाबाबत मी अजूनही पूर्णपणे समाधानी नाही,’’ असे गुकेश म्हणाला.

या विजयामुळे गुकेश (६.५ गुण) आता गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर पोहोचला असून प्रज्ञानंद (६ गुण) त्याच्यापेक्षा एका स्थानाने मागे आहे. पाच वेळचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन मात्र तळाला घसरला आहे. पाचव्या फेरीत त्याला वेस्ली सो याने पराभूत केले. त्याचा हा स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला. त्यामुळे तो आता गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या अलिरेझा फिरुझापेक्षा साडेपाच गुणांनी मागे पडला आहे. फिरुझाने व्हिन्सेन्ट केमेरला पराभूत केले. त्यामुळे त्याचे आता १० गुण झाले आहेत. महिलांमध्ये, नागपूरकर दिव्या देशमुखने जिनेरवर मात केली. तिचे आता ८.५ गुण झाले असून ती दुसर्‍या स्थानावरील बिबिसारा असाउबायेवा हिच्यापेक्षा अध्र्या गुणाने पुढे आहे. बिबिसाराला पाचव्या फेरीत ॲना मुझिचुककडून हार पत्करावी लागली. तसेच भारताच्या कोनेरू हम्पीने जगज्जेत्या जू वेन्जूनवर विजय मिळवला.