ओस्लो : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणार्‍या मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जोरदार पुनरागमन करताना पारंपरिक (क्लासिकल) प्रारूपातील जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशला पराभूत केले. त्यामुळे युवा भारतीय खेळाडू गुणतालिकेत आता तळाला पोहोचला आहे. तर, आर. प्रज्ञानंदने व्हिन्सेंट केमेरला ‘आर्मागेडॉन’ डावात पराभूत करीत दुसरे स्थान कायम राखले.

सात वेळा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळविणार्‍या कार्लसनने संथ सुरुवात केल्यानंतरही जोरदार पुनरागमन केले. या विजयामुळे त्याने तीन गुणांची कमाई केली आणि त्यामुळे तो अखेरच्या स्थानावरून चौथ्या स्थानी पोहोचला.

दुसरीकडे, पराभवानंतर निराश झालेल्या गुकेशने मुख्य द्वारापासून जाणे टाळले आणि पाठच्या दरवाजाने तो बाहेर निघून गेला. स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने चाहते त्याच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत होते. चौथ्या फेरीनंतर अलिरेझा फिरुझा शीर्ष स्थानी आहे. फिरुझाला अमेरिकेच्या वेस्ली सोकडून स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. वेस्लीने पारंपरिक प्रारूपातील लढत बरोबरीत राहिल्यानंतर ‘आर्मागेडॉन’ डावात त्याला नमविले. पराभवानंतरही फिरुझाला एक गुण मिळाला. आता ८.५ गुणांसह तो शीर्ष स्थानावर आहे. प्रज्ञानंद सहा गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे. वेस्लो सो (५.५ गुण) तिसर्‍या व कार्लसन (४.५ गुण) चौथ्या स्थानावर आहे. केमेरच्या खात्यात चार गुण असून जगज्जेता गुकेश ३.५ गुणांसह सर्वात तळाशी आहे.

गुकेशसाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरताना दिसत आहे. त्याला वर्षाअखेरीस जागतिक अजिंक्यपद लढतीत जावोखिर सिंदारोवचा सामना करायचा आहे. गेल्या वर्षी गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर कार्लसनची भावनिक प्रतिक्रिया समोर आली होती. मात्र, यंदा त्याने संयमित आणि व्यावसायिक पद्धतीने काळा मोहर्‍यांसह खेळताना सामन्यात विजय नोंदवला. त्याने ४२व्या चालीत गुकेशला अडचणीत आणत चमकदार कामगिरी केली.

आता गुकेशची गाठ पुढच्या फेरीत आर. प्रज्ञानंदशी होणार आहे. प्रज्ञानंदने स्पर्धेत चांगल्या मानसिकतेने खेळ केला. प्रज्ञानंद आणि केमेरदरम्यान पारंपरिक प्रारूपातील सामन्यात दोन्ही खेळाडूंना विजयाची संधी होती. मात्र, प्रज्ञानंदने ‘आर्मागेडॉन’ डावात १७ चालींसह विजय नोंदवत १.५ गुण मिळविले.

महिला गटात दिव्याचा पराभव

  • महिला गटात भारताच्या दिव्या देशमुखला सलग ‘आर्मागेडॉन’ डावातील विजयानंतर प्रथमच पराभूत व्हावे लागले. ॲना मुझिचुकने तिला नमविले.
  • या पराभवामुळे विश्वचषक विजेत्या दिव्याची ५.५ गुणांसह तिसर्‍या स्थानी घसरण झाली.
    कोनेरू हम्पीचा स्पर्धेतील संघर्ष सुरू आहे.
  • हम्पीला झू जिनेरकडून ‘आर्मागेडॉन’ डावात पराभूत व्हावे लागले. ती सहा खेळाडूंमध्ये सध्या अखेरच्या स्थानी आहे. महिला गटात बिबिसारा असाउबायेवा सात गुणांसह शीर्ष स्थानी आहे.
  • तिच्यानंतर मुझिचुक, दिव्या आणि जिनेर यांचे ५.५ गुण आहेत. जू वेन्जूनचे चार गुण आणि हम्पीचे तीन गुण आहेत.

सलग तीन दिवसांचा खराब खेळ आणि वेळेच्या दबावामुळे मी थकलो होतो. डावाची सुरुवात अपेक्षेनुसार राहिली आणि त्यामुळे मी समाधानी होतो. मी गुकेशची सुरुवातीची चाल पाहून आश्चर्यचकित झालो. त्यानुसार डाव बरोबरीत राहील असा माझा अंदाज होता. गुकेश आघाडी मिळविण्याच्या दिशेने खेळत होता. मात्र, त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आणि मग मी सामन्यावर नियंत्रण मिळविले. – मॅग्नस कार्लसन.