वृत्तसंस्था, ओस्लो: भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत भारतीय सहकारी आणि विद्यमान जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशचा अवघ्या ३४ चालींत पराभव करत जेतेपदाच्या आशा पल्लवित केल्या. या विजयामुळे प्रज्ञानंदच्या खात्यात १५ गुण झाले असून तो आघाडीवर असलेल्या वेस्ली सो याच्यापेक्षा केवळ अध्र्या गुणाने मागे आहे. त्यामुळे अंतिम फेरीपूर्वी चुरस निर्माण झाली आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीला प्रज्ञानंदची कामगिरी निराशाजनक झाली होती आणि तो गुणतालिकेच्या तळाशी घसरला होता. मात्र, गेल्या काही फेर्‍यांत त्याने अप्रतिम खेळ करताना सलग तीन विजय मिळवत थेट किताबाच्या शर्यतीत प्रवेश केला. गुकेशविरुद्धच्या लढतीतही त्याने संयम, चालींमध्ये अचूकता आणि वेळेचे उत्तम व्यवस्थापन याचा समन्वय साधत त्याने महत्त्वपूर्ण विजय नोंदवला.

‘‘या स्पर्धेत याआधी झालेल्या गुकेशविरुद्धच्या सामन्यातही माझ्याकडे जिंकण्याची संधी होती. पण वेळेच्या दडपणाखाली मी चूक केली. गुकेश साधारणपणे काहीतरी अनपेक्षित आणि सर्जनशील चाल खेळतो, मी त्याचा जास्त विचार करून चुका करतो. यावेळी मात्र मी वेळेचे व्यवस्थापन चांगले केले आणि चालीही अचूक खेळलो. एकूणच या डावात माझा खेळ उत्कृष्ट झाला,’’ असे लढतीनंतर प्रज्ञानंद म्हणाला.

पुरुष विभागातील अन्य एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ली सो याने ‘आर्मागेडॉन’ टायब्रेकमध्ये मॅग्नस कार्लसनचा पराभव करून आघाडी कायम राखली. अंतिम फेरीत प्रज्ञानंदची जर्मनीच्या व्हिन्सेन्ट केमेरशी, तर वेस्ली सो याची अलिरेझा फिरुझाशी गाठ पडणार आहे. वेस्ली (१५.५ गुण), प्रज्ञानंद (१५ गुण) आणि फिरुझा (१४.५ गुण) या तिघांमध्ये विजेतेपदासाठी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कार्लसन आणि गुकेश
यांना अंतिम फेरीत तळाचे स्थान टाळण्यासाठी झुंज द्यावी लागणार आहे.

महिलांत बिबिसारा विजेती

महिला विभागात कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेवा हिने अंतिम फेरीपूर्वीच विजेतेपद निश्चित केले. नवव्या फेरीत तिला ॲना मुझिचुककडून ‘आर्मागेडॉन’ डावात हार पत्करावी लागली. मात्र, पारंपरिक लढत बरोबरीत सोडवल्याने मिळालेल्या गुणाचा तिला फायदा झाला. भारतीय खेळाडूंमध्ये दिव्या देशमुखला चीनच्या झू जिनेरकडून पराभव पत्करावा लागला. कोनेरू हम्पी जगज्जेत्या ज्यू वेन्जूनकडून ‘आर्मागेडॉन’मध्ये पराभूत झाली.