स्टॅव्हंगर (नॉर्वे) : भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने नॉर्वे स्पर्धेच्या पारंपरिक (क्लासिकल) विभागातील नवव्या आणि अखेरच्या फेरीत आर्यन तारीवर मात केली. मात्र, स्पर्धेअखेरीस त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नॉर्वेचा जगज्जेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने अपेक्षित कामगिरी करताना या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

अखेरच्या फेरीत ५२ वर्षीय आनंद आणि तारी या दोघांमधील नियमित लढत २२ चालींअंती बरोबरीत सुटली. त्यानंतर बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या अर्मागेडन डावात आनंदने ८७ चालींमध्ये सरशी साधत या स्पर्धेची विजयी सांगता केली.

आनंदने नॉर्वे स्पर्धेच्या पारंपरिक विभागातील नऊपैकी सहा लढती जिंकल्या, तर दोन लढतींमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला. सहाव्या फेरीत अनिश गिरीविरुद्धची लढत अर्मागेडनमध्येही अनिर्णित राहिली; परंतु नियमानुसार, काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या आनंदला विजयी ठरवत अधिक अर्धा गुण कमावता आला. आनंदने नऊ फेऱ्यांमध्ये एकूण १४.५ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. कार्लसनने एकूण १६.५ गुणांसह अग्रस्थान पटकावताना ही स्पर्धा जिंकली.