ओस्लो : युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने गतवर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करताना अनुभवी भारतीय सहकारी कोनेरू हम्पीवर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतही विजय मिळवला. पदार्पणाच्या नॉर्वे स्पर्धेत दिव्याने चमकदार कामगिरी केली असून पहिल्या फेरीत तिने जगज्जेत्या चीनच्या जू वेन्जूनला पराभवाचा धक्का दिला होता. दिव्याने या दोन्ही लढत ‘आर्मागेडॉन’ टायब्रेकरमध्ये जिंकल्या. खुल्या विभागात, जगज्जेता दोम्माराजू गुकेश आणि आर. प्रज्ञानंद यांना मात्र दुसर्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
महिला विभागात दुसर्या फेरीत पांढर्या मोहर्यांनी खेळताना दिव्याने हम्पीच्या राजावर जोरदार हल्ला चढवला. दोन्ही खेळाडूंनी विरुद्ध बाजूला किल्लाबंदी केल्याने सामना अत्यंत तांत्रिक झाला, पण सक्रिय हत्ती आणि अश्वाच्या मदतीने दिव्याने सातत्याने आक्रमण कायम ठेवले. तिने हम्पीवर दडपण राखले. मात्र, तिला निर्णायक चाल रचता न आल्याने या लढतीचा पारंपरिक डाव बरोबरीत सुटला. मग ‘आर्मागेडॉन’मध्ये अश्वांच्या प्रभावी हालचाली आणि वजिराच्या बाजूने चांगला खेळ करत दिव्याने विजय मिळवला.
दोन फेर्यांनंतर दिव्याच्या खात्यावर तीन गुण जमा झाले आहेत. हम्पीला पहिल्या फेरीत बिबिसारा असाउबायेवाने पारंपरिक डावात पराभूत केले होते. मात्र, दुसर्या फेरीत दिव्याविरुद्ध किमान पारंपरिक डाव बरोबरीत सोडवल्याने हम्पीला एक गुण मिळवता आला.
खुल्या विभागात, प्रज्ञानंद फ्रान्सचा ग्रँडमास्टर अलिरेझा फिरुझाकडून पराभूत झाला. या विजयामुळे फिरुझा सहापैकी सहा गुण मिळवून अग्रस्थानी पोहोचला आहे. गुकेशने अमेरिकेच्या वेस्ली सोविरुद्ध पारंपरिक डाव बरोबरीत राखला, पण ‘आर्मागेडॉन’ टायब्रेकरमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला. मॅग्नस कार्लसनने विजयी पुनरागमन करताना जर्मनीच्या व्हिन्सेन्ट केमेरला ‘आर्मागेडॉन’मध्ये नमवले.
